mla sanjay gaikwad 
Latest

ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांनी ५० फूट बाजूला ढकलले, आमदार गायकवाडांच्या गोष्टी आणि बरंच काही!

स्वालिया न. शिकलगार

बुलडाणा : विजय देशमुख : शिंदे गटाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत काही गोष्टी सांगितल्या. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुलाच्या (कुणालच्या) लग्नाची पत्रिका घेऊन ते निमंत्रण द्यायला गेले असता ठाकरेंच्या समक्ष ताफ्यातील सुरक्षा रक्षकांनी गायकवाडांना ५० फूट बाजूला ढकलले. एका आमदारावर असा प्रसंग उभारला असतानाही ठाकरे यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. अतिशय जिव्हारी लागणारी, आत्मसन्मान दुखावणारी अशीच ती घटना होती. अशावेळी कुणी एखादा 'राजकारण गेलं चुलीत' असं म्हणत पाय आपटत निघून आला असता! पण गायकवाडांनी तो प्रकार सहन केला होता आणि आजवर कुणाला सांगितलाही नव्हता.

गळ्यात धारण केलेल्या रूद्राक्ष माळा या क्रोध नियंत्रित करून व्यक्तीला शांत ठेवतात असं म्हटलं जातं. स्व. इंदिराजी गांधी, स्व. बाळासाहेब ठाकरे या शिघ्रकोपी प्रभावशाली नेत्यांच्या गळ्यात रूद्राक्ष माळा होत्या हे सर्वांनाच ठाऊक आहे. स्फटीक, पोवळे वा रूद्राक्ष माळा ही कधी आवश्यकता असते किंवा कुणाची हटके स्टाईल!

आपल्या नेहमीच्या माळा आ. गायकवाड यांच्या गळ्यात यावेळी दिसल्या नाहीत. पत्रकारांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही. यावर विचारल्यावर त्यांनी हजरजबाबीने सांगितले. "गुवाहाटीला विसरलो"!.

पांढऱ्या शर्टावर ठसठशीतपणे लक्ष वेधणारी सोन्याच्या ताईतात मढवलेली ती नखे, सोनसाखळीत गुंफलेल्या त्या माळा ही त्यांची ओळखच बनलेली. असा लाखमोलाचा, श्रद्धेचा ठेवा असलेले 'कवच'ते एवढ्या दूर विसरले? की आता काळाबरोबर 'लूक'ही बदलण्याचा विचार सुरू आहे भाऊ?

निधी वाटपाबाबत राष्ट्रवादीच्या पक्षपातीपणावर ठपका ठेवताना आ. गायकवाड म्हणतात, रा. काँ. चे पालकमंत्री त्यांच्या नगरसेवकांना ४०-५० लाखांचा विकास निधी द्यायचे. मात्र, आमच्या नगरसेवकांना लाखाचाही निधी मिळायचा नाही. याचवेळी गायकवाडांनी एक महत्वाची माहिती सांगितली. मागील महिन्यात राष्ट्रवादीची एक खास टीम बुलडाणा मतदारसंघात विधानसभेच्या संभाव्य उमेदवारीसाठी सर्वेक्षण मोहिमेवर येऊन गेली. येथील आजी-माजी आमदार, भाजपमधील प्रभावी नेता किंवा अन्य कुणी रा. काँ. साठी योग्य उमेदवार असू शकेल का? अशी त्यांची चाचपणी होती. ही बाब आपण उद्धवजींनाही सांगितली. पण, त्यांनी ते गांभीर्याने घेतले नव्हते.

शिवसेनेतील बंडाच्या एक आठवड्याआधी फोटोसह एक बातमी होती. ४०० कोटींची बोदवड सिंचन योजना तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटलांनी मंजूर केल्याची. त्या बैठकीला आ. संजय गायकवाड आणि तत्कालीन मंत्री डाँ राजेंद्र शिंगणे हेही उपस्थित होते. एकीकडे लाखाच्या स्थानिक विकास निधीसाठी शिवसेनेच्या नगरसेवकांना वंचित ठेवणाऱ्या रा. काँने आ. गायकवाड यांच्या मागणीवर एवढी मोठी योजना मंजूर केली. हे चित्र आधीच्या तक्रारींशी विसंगत आणि आश्चर्यकारकही होते. आ. गायकवाडांनाच अशाप्रकारे वश करून पुढे विधानसभेसाठी गळाला लावण्याची रा.काँ. ची अदृश्य चाल होती का? नंतर'भुकंपा'ने उलथापालथ झाली आणि हा प्रश्न अनुत्तरितच राहिला!

शिंदे गट व भाजपाचे नवे सरकार अस्तित्वात आले. आ. गायकवाड हे बुलडाण्यात आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी जिल्हा भाजपचे महामंत्री योगेंद्र गोडे, शहर प्रमुख शर्माजी, उदय देशपांडे आदींसह भाजपाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उत्स्फूर्ततेने व मोठ्या संख्येने पुष्पगुच्छ व गुलाबाचा भला मोठा पुष्पहार घेऊन आले होते.

"तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा" अशा धर्तीचा एका नैसर्गिक युतीच्या मनोमिलनाचा हा सोहळा वाखाणण्यासारखा होता. यापुढील सर्व निवडणुका नव्या युतीला एकत्रित लढावयाच्या आहेत. बुलडाण्यात नगराध्यक्षपदासाठीच्या आखाड्यात तरुणतुर्क 'पहेलवान' उमेदवार आधीपासूनच तयार आहे. भाजपला फक्त उपाध्यक्षच शोधावा लागेल. राज्याचाच कित्ता इथेही गिरवला जाईल. हातच्या कांकणाला आरसा कशाला! उद्धवजी फोन घेत नव्हते, याबाबत आपला एक अनुभव आ. गायकवाड यांनी सांगितला.

निवासस्थानाच्या भिंतीजवळील त्यांचे वाहन जाळण्याचा अज्ञाताकडून प्रयत्न झाला होता. हा मोठा घातपात घडवण्याचा प्रकार वाटल्याने पुढील तपासाच्या कारवाईसाठी मुख्यमंत्री ठाकरेंना फोनने संपर्क करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण, फोन जोडून दिला गेला नाही. या प्रकाराने आपण कमालीचे व्यथित झालो होतो असे गायकवाड सांगतात. फोन टाळण्याबाबतचे असे प्रसंग सामान्य जनतेच्या वाट्याला येऊ नयेत असे वाटत असेल तर लोकप्रतिनिधींनाही आपले सर्व मोबाईल नंबर सर्व जनतेसाठी खुले ठेवावे लागतील! फोन टाळणाऱ्या पक्षप्रमुखांचा ताजा धडा समोर आहेच की!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT