शशिकांत भालेराव
पारनेर : आमदार नीलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीला हजेरी लावली, तसेच त्यांच्या सोबत बाजार समितीचे उपसभापती बापू शिर्के, अशोक घुले, भाऊ साठे असणार्या कार्यकर्त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सध्या ते अजित पवारांसोबत असल्याचे चर्चा आहे.
राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाची वेगवेगळ्या ठिकाणी बैठक पार पडली. या बैठकीला पारनेर राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके कोणती भूमिका घेतात याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष होते, सकाळी पार पडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीला आमदार नीलेश लंके यांनी उपस्थिती दर्शवल्यामुळे उपमुख्यमंत्री पवारांसोबत आहेत का? याबाबत चर्चांना उधाण आले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी कार्यकर्त्यांच्या बूथ कमिट्यांसाठी बैठक बोलावली, त्या बैठकीत कार्यकर्त्यांचे मते जाणून घेण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आमदार लंके घेतील त्या निर्णयासोबत राहणार असल्याचे मत व्यक्त केले. यानंतर आमदार लंके यांनी शरद पवार आपले दैवत असून, सुप्रिया सुळे व अजित पवार आपले कुटुंब आहेत. त्या कुटुंबामध्ये पडलेल्या फुटीमुळे आपल्याला निर्णय घेणे अवघड झाले आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. मुंबई येथे होणार्या दोन्ही गटाच्या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते; मात्र उपमुख्यमंत्री पवारांच्या मेळाव्याला उपस्थिती दाखवल्यानंतर असलेले आमदारांना थेट बसमध्ये बसून इतरत्र हलवण्यात आले. त्यामुळे ते शरद पवारांच्या मेळाव्यास उपस्थित राहू शकले नसतील, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.