Latest

उदयनराजे म्हणाले, ‘मकरंद आबाच सातारा जिल्ह्याचे बॉस!’ (Video)

रणजित गायकवाड

सातारा : पुढारी वृत्तसेवा

किसनवीर कारखाना निवडणुकीत केलेल्या अभूतपूर्व सत्तांतरानंतर आमदार मकरंद आबा पाटील यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. जलमंदिर येथे मकरंद आबा यांना पाहताच खा. उदयनराजे यांनी आपल्या स्टाईलमध्ये 'जिल्ह्याचे बॉस आले' असे म्हणून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून लागून राहिलेल्या भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आ. मकरंदआबा पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी बचाव पॅनेलने तब्बल 19 वर्षांनंतर सत्तांतर घडवून विरोधकांचा 21-0 ने सफाया केला. या निवडणुकीत शेतकरी बचाव पॅनेलच्या उमेदवारांनी 9 हजार 500 मतांचे भरभक्कम मताधिक्य घेऊन दिग्विजय संपादित केला. मदनदादा भोसले यांच्या ताब्यात असलेले एकमेव सत्तास्थानही खालसा करून किसन वीर कारखाना 'आबां'चाच असल्याचे मतदारांनी मतपेटीतून सिद्ध केले.

या दणदणीत विजयानंतर मकरंद आबा हे खा. उदयनराजेंच्या भेटीला जलमंदिर येथे आले होते. यावेळी उदयनराजेंनी मकरंद आबांना पाहताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आणि आबांना प्रेमाने मिठी मारली. यावेळी उदयनराजेंच्या कौतुकाने मकरंद आबा भारावलेले. ते म्हणाले, 'आम्ही कसले बॉस ?'. त्यावर लगेचच उदयनराजे बोटे मोजत म्हणाले, '३ कारखाने, जिल्हा बँक, आमदारकी म्हणजे बॉसच की! बास काय आबा??? जिल्ह्याचा बॉसच. उदयनराजेंच्या या संवादानंतर मकरंद आबा खळखळून हसले. उदयनराजे यांनी त्यांना प्रेमाने जलमंदिरात नेऊन त्यांचा सत्कार केला. पेढा भरवला. मकरंद आबांनी ही शाल देऊन उदयनराजे यांचे आभार मानले.

कधीकाळी उदयनराजे आणि मकरंद आबा यांच्यात तना-तनी ही झाली होती. जलमंदिर येथील दोघांमधील भेटीने नव्या मैत्री पर्वाला प्रारंभ झाल्याची चर्चा जिल्याच्या राजकारणात रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT