Latest

MLA Disqualification Hearing : एकनाथ शिंदेंना मिलिंद नार्वेकर का भेटले, माहीत नाही; सुनील प्रभू यांची साक्ष

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे आणि इतर आमदार संपर्कात नव्हते, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. मग, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार रवींद्र फाटक हे सूरतला एकनाथ शिंदे यांना का भेटले, असा प्रश्न शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. त्यावर, हे दोघे सूरतला कशासाठी गेले हे मला माहीत नाही. मात्र, शिंदेसह इतर आमदार संपर्कात नसल्यानेच बैठकीसाठी व्हीप बजावला, असा दावा ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी केला.

शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मंगळवारी नियमित सुनावणीला सुरूवात झाली. ठाकरे गटाने आपल्याकडील कागदपत्रे सादर केली. या सुनावणीत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्यासह डझनभर वकिलांची फौज उपस्थित होती. तर, ठाकरे गटाकडून वकील देवदत्त कामत यांनी किल्ला लढविला. ठाकरे गटाकडून सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर आज त्यांची उलटतपासणी साक्ष नोंदविण्यात आली. युतीमध्ये लढविलेली विधानसभा निवडणूक, प्रचारात वापरलेले फोटो इथपासून शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसाठी इंग्रजी भाषेतील याचिकेवरून जेठमलानी यांनी प्रभू यांना अक्षरश: घेरण्याचा प्रयत्न केला.

जेठमलानी यांनी आपल्या वकीली प्रश्नांनी प्रभूंना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रभू यांनी शिताफीने अडचणीचे मुद्दे वगळत आपली भूमिका मांडत राहण्याचे धोरण या साक्षीत कायम ठेवले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची 2019 ची युती होती का, हे सत्य आहे का? ही निवडणूक लढवताना काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्ले चढविले का? प्रचारात नरेंद्र मोदींचा फोटो वापरला होता का, असे प्रश्नही जेठमलानी यांनी केले. यावर, मी विकासाची काम केली आणि त्याच कामांच्या आधारे जनतेकडे मत मागितली. त्यामुळे कोणावर टीका करायची माझ्यावर वेळ आली नाही, असे उत्तर देत प्रभू यांनी आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. तर, मोदींचे फोटो वापरले का, हे चक्क आठवत नसल्याचे सांगतानाच बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे फोटो मात्र वापरले होते, हे नमू्द करायला मात्र ते विसरले नाहीत.

या सुनावणीत ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी सतत व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची मागणी केली. यावर, मी तीनवेळा मागणी फेटाळल्यानंतरही आपण ही मागणी करत आहात हे चुकीचे असल्याचे सांगत नार्वेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

मराठी आणि इंग्रजीवरून शाब्दिक कसरत

सुनावणीत सुनील प्रभू यांनी मराठी भाषेचा आग्रह धरला. त्यावर, आपण दाखल केलेली याचिका इंग्रजीत असल्याच जेठमलानी यांनी निदर्शनास आणले. शिवाय, याचिका, शपथपत्र दाखल करताना ती वकिलांकडून समजून घेतली का, असे विचारले. त्यावर, आमच्या वकीलांना मराठीतून काय हवे ते सांगितले होते. त्यानुसार त्यांनी ड्राफ्ट तयार केला आणि पुन्हा मला समाजवून सांगितले. त्यावर, पण इंग्रजी भाषेत असल्याने तुम्ही न वाचता सही केली, असे समजायचे का, असा प्रतिप्रश्न जेठमलानी यांनी केला. तेव्हा मी अशिक्षित नाही. मात्र, मराठी भाषेत मी काँन्फीडन्ट आहे. त्यामुळे इंग्रजीतील प्रत्येक शब्द वकील असिम सरोदे यांच्याकडून समजावून घेतला आणि मगच सही केल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT