Latest

सांगली : पाणी प्रश्नावरुन आमदार-खासदारांच्यात जुंपली; संजय पाटील यांना भान ठेवून बोलण्याचा बाबर यांचा इशारा

backup backup

विटा; पुढारी वृत्तसेवा : जीवावर उदार होऊन आम्ही तुम्हाला सत्तेत आणले आहे, तुमच्या बरोबर आम्हीही आलो असू, पण एकत्रित सत्तेत असताना मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराबाबत बोलताना भान ठेवा, अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी भाजपचे खासदार संजय पाटील यांना राजधर्माची आठवण करून दिली.

शनिवारी (दि. २५) सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी, साताऱ्याचे पालकमंत्री हे जलसंपदाच्या स्थानिक अधिकाऱ्यांवर दबाव आणतात, त्यांच्या संगण्यावरूनच कोयनेचे पाणी खाली सोडले जात नाही, पाणी सोडण्याबाबत सातारच्या पालकमंत्र्यांची लुडबुड आम्ही खपवून घेणार नाही. तसेच आमदार बाबर मुख्यमंत्र्यांना फोन करतात आणि मग पाणी सुटते, हा काय प्रकार आहे? मुख्यमंत्री दान द्यायला बसलेत का? त्यांना अधिकारच काय? असे प्रश्न सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित करत पाण्यासाठी प्रसंगी राजीनामा देऊ, असा इशारा खासदार संजय पाटील यांनी दिला होता. त्यावर विट्यात आज (दि. २६) आमदार अनिल बाबर यांनी पत्रकार बैठक घेत खासदार पाटील यांच्यावर शरसंधान साधले.

खासदार पाटील यांनी भान ठेवून बोलावे : आमदार बाबर

बाबर म्हणाले, मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना खासदार पाटील यांनी जपून बोलावे. अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला त्याची गांभीयनि दखल घ्यावी लागेल. पाणी पाण्याच्या मार्गाने जाईल. तुम्हाला राजीनामा द्यायचा असेल, तर दोन महिने राहिले असताना आणि पाण्याचा प्रश्न सुटल्यावर कशासाठी देताय? असा सवाल करीत आम्ही कोणत्याही परिणामांची पर्वा न करता तुम्हाला सत्तेत येण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळे सरकार चालवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर टिका करताना भान ठेवून बोलावे.

ते पुढे म्हणाले की, गेल्या दहा-बारा दिवसांपासून कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्यानंतर कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत होते. जनतेसाठी महत्त्वाचा प्रश्न असल्याने सर्वांचेच प्रयत्न सुरू होते. या दरम्यान खासदार संजय पाटील यांचा मला फोन आला होता. तुम्ही मुख्यमंत्री शिंदे आणि सातारा पालकमंत्री देसाई यांच्याशी बोला. आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतो, पाणी मिळणे महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. आम्ही आमच्या पातळीवर प्रयत्न करून मुख्यमंत्री शिंदे आणि सातारा पालकमंत्र्यांशी बोलून प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे पाणी सोडण्यात आले आणि जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा हा प्रश्न मार्गी लागला.

सगळं झाल्यावर अचानक खासदार पाटील यांना कशाचा साक्षात्कार झाला माहित नाही, त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि सातारा पालकमंत्र्यांवर टिका केली. पाण्याचा त्यांचा अभ्यास आहे. त्यांची बोलण्याची पद्धत तशी आहे, याची आम्हाला कल्पना आहे. पण मुख्यमंत्री आणि सरकार मधील मंत्र्यावंर बोलताना आपण सर्वांनी भान ठेवले पाहिजे. आम्ही सर्वांनी तुम्हाला सत्तेत आणण्यासाठी परिणामांची पर्वा न करता धाडसी पाऊल उचलले. आम्ही आणि तुम्ही मिळून ही सत्ता चालवत आहोत. महायुतीचे सरकार चांगले चालवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. अशावेळी तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर बोलणे योग्य नाही. त्यांना संविधानाने तो अधिकार दिला आहे. असे सांगत तरीही राजीनाम्याचे कारण वेगळे असेल तर हरकत नाही. तुम्हाला राजीनामा द्यायचा असेल तर खुशाल द्या असा टोलाही आमदार बाबर यांनी लगावला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT