विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया मानला जातो. तशाच प्रकारे व्यवसाय, उद्योग, व्यवस्था, राजकारण, अर्थकारण, परराष्ट्रसंबंध यांमध्येही विश्वास महत्त्वाचा असतो. परंतु बदलत्या काळात विश्वास निर्मितीच्या प्रक्रियेसाठीचे प्रयत्न कमी होत चालल्याने विश्वासतूट वाढत चालली आहे. 'इप्सॉस ग्लोबल ट्रस्ट वर्दीनेस इंडेक्स 2023'चा ताजा अहवाल हेच सूचित करणारा आहे. या अहवालानुसार, भारतातील विविध सेवा क्षेत्रांतील लोकांवरील विश्वास सातत्याने कमी होत असल्याचे समोर आले आहे.
इप्सॉस ग्लोबल ट्रस्ट वर्दीनेस इंडेक्स 2023 चा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्यानुसार भारतातील विविध सेवा क्षेत्रांतील लोकांवरील विश्वास सातत्याने कमी होत असल्याचे समोर आले आहे. आपल्या देशात असा एकही पेशा नाही की, ज्यावर लोकांचा पूर्णतः विश्वास आहे. साधारणत: पन्नास टक्क्यांच्या आसपास शिक्षक, डॉक्टर आणि वैज्ञानिक यांच्यावर विश्वास व्यक्त झाला आहे. ज्यांच्या हाती देशाचे भविष्य आहे, जे लोकशाहीचे स्तंभ मानले जातात, अशा लोकशाहीतील राजकीय नेतृत्व आणि प्रसारमाध्यमातील लोकांवर विश्वासाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. हा अविश्वास लोकशाहीच्या व्यवस्थेसाठी घातक ठरणारा आहे. आज आपण लोकशाही व्यवस्था भक्कम करण्यासाठीची पावले टाकत आहोत. मात्र राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी जनतेचा विश्वास गमावल्यास त्यांच्या धोरणाची अंमलबजावणीची प्रक्रिया गतिमान कशी होणार? राष्ट्र प्रगतीचे पावले टाकून विकासाकडे झेप कशी घेणार?
आपल्याला ज्या क्षेत्रात यश मिळवायचे आहे, त्या क्षेत्रातील मनुष्यबळाचा एकमेकांवर विश्वास असायला हवा असतो. अविश्वासाच्या वातावरणात प्रगतीचा आलेख फार उंचावत नाही. जगातील विविध व्यावसायिक क्षेत्रांतील कार्यरत असणार्या लोकांवर नागरिकांचा किती विश्वास आहे, हे त्या अहवालाने दर्शित केले आहे. या अहवालासाठी निवडण्यात आलेला नमुना हा जगभरातील 32 आहे. प्रतिसादकांच्या मताच्या आधारे हे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहे. जागतिक स्तरावर अधिकाधिक विश्वास डॉक्टरांवर व्यक्त झाला आहे. भारतात मात्र डॉक्टर तिसर्या स्थानावर आहेत. वैद्यकीय क्षेत्रात जे काही प्रकार जनतेच्या समोर येत आहेत, त्यामुळे अविश्वास व्यक्त होतो आहे. कोरोनाच्या काळात या क्षेत्रात सामान्यांची जी लूटमार झाली; फसवले गेले; कट प्रॅक्टीसच्या नावाखाली जे काही सुरू आहे, त्यातून सामान्यांचा विश्वास गमावणे घडत आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर भारतीयांना नेहमीच देव वाटत आले आहेत. शंभर टक्के विश्वास ठेवणारी पिढी या भूमीने पाहिली आहे.
सध्या जे काही समोर येते आहे, त्याचा तो दुष्परिणाम म्हणून विश्वास गमावणे घडत आहे. गेल्या काही वर्षांत वैद्यकीय सेवेत पैसा वर्चस्व गाजू लागला आहे. सेवाभाव कमी होतो आहे. वैद्यकीय शिक्षण महाग होत असल्याने पैसा ओतून शिक्षण घेणारी पिढी पैसा मिळविण्यासाठी वाममार्गी चालली आहे. हे एक चक्रच आहे. मात्र या चक्राचा परिणाम म्हणून विश्वास गमावणे घडते आहे. या क्षेत्रात सामान्यांना आधार मिळण्याची आशा धूसर बनते आहे. विश्वासच रुग्णाला आजारपणातून बाहेर काढत असतो. ग्राहक आणि विक्रेता हे नाते विश्वास निर्मितीतूनच अधिक भक्कम करत जाणारे ठरेल. जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांवर विश्वास असण्याचे प्रमाण तिसर्या स्थानावर आहे. भारतात विविध व्यावसायिकांपैकी सर्वाधिक विश्वास असणारा शिक्षकीपेशा हा प्रथम स्थानावर आहे. जपान आणि दक्षिण कोरिया वगळता इतर देशातील नागरिकांचा शिक्षकांवर अधिक विश्वास असल्याचे दिसून आले आहे.
भारतातील विविध पेशातील लोकांवरील विश्वासासंदर्भातील प्रमाणांचा विचार करता, दुसर्या स्थानी सशस्त्र दल आहे. त्यांच्यावर 52 टक्के लोकांनी विश्वास व्यक्त केला आहे. तिसर्या स्थानी डॉक्टर असून, त्यांच्यावर 51 टक्के लोकांनी विश्वास प्रदर्शित केला आहे. भारतातील वैज्ञानिकांवर 49 टक्के, न्यायाधीशांवर 46 टक्के, महिलांवर 46 टक्के, बँकर 45 टक्के, पाद्री आणि पुरोहित 34 टक्के, पोलिस 33 टक्के, सरकारी कर्मचारी 32 टक्के, वकील 32 टक्के इतके विश्वासाचे प्रमाण आहे. जागतिक पातळीवर विश्वासाचे प्रमाणाचा विचार करता, डॉक्टरांवर 58 टक्के विश्वास आहे, तर वैज्ञानिकावर 57 टक्के विश्वास असल्याचे दिसून येत आहे. त्या खालोखाल शिक्षक 53 टक्के, सशस्त्र दलावरही 53 टक्के विश्वास आहे. भारतात कॅबिनेट मंत्री आणि सरकारी अधिकारी यांच्यावर 39 टक्के आणि राजकारण्यांवर 38 टक्के विश्वास व्यक्त झाला आहे. जगात 60 टक्के लोकांनी राजकारण्यांना सर्वात अविश्वासू मानले आहे. जे राज्यकर्ते देशाच्या विकासाचे धोरण आखतात, त्यांच्यावर विश्वास नसेल, तर विकासाचे चाक गती कशी घेणार? हा प्रश्न आहे. येथील राजकारण्यांसाठी अविश्वास हा धोक्याचा इशारा आहे. शिक्षण हे ज्ञानदानाचे पवित्र मंदिर मानले जात होते. आज त्या मंदिराचे स्वरूप बदलत चालले आहे.
शाळा आणि शिक्षक हे ज्ञान, माहिती विक्री करणारी केंद्र ठरू लागले आहे. शिक्षण विकले जाते आणि ते विकत घेतले जाते, ही धारणा अधिक पक्की होत चालली आहे. त्यामुळे शिक्षकांवरील विश्वास गमावणे तर घडत नाही ना? शेवटी शिक्षकीपेशा हा धर्म आहे. तेथे काम करणारी माणसे ही नोकर नाहीत, तर राष्ट्राचे निर्माते असतात, असे मानले जात होते. आपल्या संस्कृतीत आई-वडिलांनंतर सर्वात महत्त्वाचे आणि वरचे स्थान कोणाला असेल? तर ते शिक्षकांना आहे. आज त्या उंचीला धक्का लागत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. राजकारणी देशाचे धोरण आखत असतात. मात्र त्यांच्यावर जर विश्वास नसेल, तर ते ज्या व्यवस्थेवर स्वार आहेत, त्या व्यवस्थेबद्दल जनमानसाच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. राजकारणी विकासाभिमुख असतात, त्यांच्या धोरणात राष्ट्र व समाजहित सामावलेले असते, ही धारणा जनसामान्यांच्या मनात पक्की व्हायला हवी आहे. मात्र दुर्दैवाने लोकशाहीत मतासाठी-सत्तेसाठी सर्व काही असा विचार करत होणार्या निवडणुका होणारी भाषणे, दिली जाणारी आश्वासने, संघर्ष हे सारेच जनता अनुभवत असते. केवळ निवडणुकीचा जुमला म्हणून त्याकडे राजकारणी दुर्लक्ष करत जातात; पण या सर्व प्रक्रियेचे फलित म्हणून राजकारण्यांवरील अविश्वास वाढत जाणे असते, हेही लक्षात घ्यायला हवे.