उमरखेड, पुढारी वृत्तसेवा : कर्करोगाची गाठ असताना, ती साधी गाठ असल्याचे सांगून रुग्णाची दिशाभुल व आर्थिक लूट केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून, उमरखेड पोलिसांनी, येथील एका डॉक्टरविरुद्ध फसवणूक व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. डॉ. शिवानंद कवाने असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.
तालुक्यातील विडूळ येथील शिवराम पांडुरंग शिंदे यांच्या मानेला गाठ आली होती. ती गाठ कॅन्सरची असताना, येथील डॉ . शिवानंद कवाने यांनी ती गाठ साधी असल्याचे सांगितले. डॉक्टरने शिंदे यांची दिशाभूल व फसवणूक करून आर्थिक लाभासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रियासुद्धा केली. त्यामुळे ६ नोव्हेंबर रोजी शिवराम शिंदे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या घटनेची तक्रार मृताचा मुलगा सुरेश शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ६ जानेवारीला केली. मात्र, त्यांच्या तक्रारीवरून कोणताही तपास पोलिसांकडून झाला नाही .
अखेर सुरेश शिंदे यांनी उमरखेड न्यायालयात २३ मार्चला १५३ ( ३ ) नुसार प्रकरण दाखल केले.
याप्रकरणाची दखल घेत न्यायालयाने २९ एप्रिलला अंतरिम आदेश मंजूर केला. त्यात डॉ. कवाने यांच्याविरूध्द भादंवि ३०४ अ , ४२० कलमानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अमोल माळवे यांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक अमोल राठोड करीत आहेत. तपासातील तथ्य पुढे आल्यानंतर या प्रकरणी अटकेची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती तपास अधिकार्यांनी दिली.