नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशातील ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करवून देण्याचे प्रमुख उदिष्ट खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) आहे. उदिष्टपुर्तीच्या अनुषंगाने गत ९ वर्षात रोजगार निर्मितीत ३६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आल्याचा दावा सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाने केला आहे.
२०१३-१४ या आर्थिक वर्षात या क्षेत्रात एकत्रित रोजगार १ कोटी ३० लाख ३८ हजार ४४४ एवढा होता. २०२२-२३ मध्ये यात ३६ टक्क्यांची वाढ नोंदवत ही संख्या १ कोटी ७७ लाख १६ हजार २८८ वर पोहोचली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षात निर्माण झालेल्या ५ लाख ६२ हजार ५२१ नवीन रोजगार संधीच्या तुलनेत २०२२-२३ या आर्थिक वर्षात ७०% वाढीसह एकूण ९ लाख ५४ हजार ८९९ रोजगार संधी निर्माण झाल्याचा दावा सरकारने केला आहे.
विशेष म्हणजे गत ९ वर्षांमध्ये ग्रामीण भागातील कारागिरांनी तयार केलेल्या स्वदेशी खादी उत्पादनांच्या विक्रीने ३३२ टक्क्यांची अभूतपूर्व वाढ नोंदवली असल्याचे देखील सरकारने सांगितले आहे.आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये आयोगाची उलाढाल ३१,१५४ कोटी रुपये होती. २०२२-२३ मध्ये आयोगाने १,४३,६३० कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल केली. दरम्यान ग्रामीण भागांमध्ये ९,५४,८९९ नवे रोजगार निर्माण करण्यात आले.
आर्थिक वर्ष २०१३-१४ ते आर्थिक वर्ष २०२२-२३ या कालावधीत केव्हीआय उत्पादनांच्या निर्मितीमध्ये २६८% ची वाढ झाली तर या उत्पादनांच्या विक्रीचे सर्व विक्रम मोडीत काढत या उत्पादनांच्या विक्रीने तब्बल ३३२% ची वाढ नोंदवली असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.