मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई- गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात अतिशय वेगाने सुरु आहे. गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेन आणि वर्षाअखेरपर्यंत पूर्ण महामार्ग देशसेवेसाठी तयार होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. राज्याच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करणारे महाराष्ट्र सैनिक कसे? सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड ही विनाशकारी मानसिकतेची आहे, अशी टीका मंत्री चव्हाण यांनी मनसेवर केली आहे.
रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी महामार्गावर तोडफोड केली होती. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मंत्री चव्हाण यांनी पत्रामध्ये म्हटले आहे की, गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जाण्यापूर्वी सिंगल लेन पूर्ण झालेली असेल याचा मी अत्यंत जबाबदारीने पुनरुच्चार करतो. डिसेंबर २०२३ पर्यंत मुंबई- गोवा महामार्ग तयार होईल हा शब्द देतो. दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको आता त्याऐवजी दगड रचून नवा इतिहास रचणारी प्रगतिशील कामं करणारी तरुणाईची साथ हवी आहे, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात त्रिशुळ सरकार गतिमान पद्धतीने काम करत आहे. या कामातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. या महामार्गावरील केवळ खड्डे न बुजवता सीटीबी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समस्येला कायमस्वरूपी पूर्णविराम दिला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालयं फोडण्यापर्यंत मजल गेली आहे. या तोडाफोडीमुळे महामार्गाचे काम करणाऱ्या कामगारांमध्ये दहशत पसरत आहे. अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सुरु असलेल्या कामांना हातभार लावण्याऐवजी अशाप्रकारे आडकाठी आणून यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? असा सवाल करत गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेन आणि वर्षाअखेरपर्यंत पूर्ण महामार्ग करणारच अशा निश्चयातून आपला विभाग काम करत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा :