पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर जिल्ह्यातील विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध पार पडली. पालकमंत्री सतेज पाटील यांची निवड झाल्याने त्यांनी आपला गड शाबूत ठेवत आपणच जिल्ह्याचे पालक असल्याचे सांगितले. कोल्हापूर जिल्ह्याचेच नाहीतर सबंध महाराष्ट्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री अजीत पवार (Minister Ajit Pawar) यांनी सतेज पाटील यांच्या विजयावर भाष्य केले आहे. ते पुण्यातील एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुण्यात पत्रकार परिषदेदरम्यान उपमुख्यमंत्री पवारांना विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या महाविकास आघाडीचा भाजपसोबत समझोता झाला का? तसेच सतेज पाटील आणि महाडिक हे एकमेकाला पाण्यात बघतात अश्या ठिकाणी निवडणुका बिनविरोध होतात अशी विचारणा करण्यात आली. यावेळी पवार आपल्या शैलीत उत्तर देत म्हणाले. विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याचा पहिल्यांदा प्रस्ताव भाजपकडून आला.
कोल्हापूरच्या जागेबाबत विरोधकांना आपला पराभव दिसत होता. काही जागांसाठी घोडेबाजार मोठा होणार होता म्हणून त्यांनी बिनविरोधचा प्रस्ताव ठेवला. पण कोल्हापुरात कोणी कितीही गप्पा मारल्या आणि आवाज काढला तरी सतेज पाटील निवडून येणार होते.
कारण तिथे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेची मते जास्त होती. यामुळे बाजू क्लिअर होती. यामुळे सतेज पाटील यांचा विजय निश्चीत होता असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. धुळ्यामध्येही अमरिश पटेल यांच्याबाबतीतही तसेच होते यामुळे हे कोणीही नाकारू शकत नाही.
टोकदार राजकीय संघर्ष ते माघार या पाटील-महाडिक घराण्याच्या राजकारणाला विधान परिषदेतील माघारीने काही काळासाठी ब्रेक लागला आहे. ज्याची त्याची सत्तास्थाने कायम ठेवायची का? माघारीमागे हे सूत्र आहे का? हे आता छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीतच स्पष्ट होईल. तूर्त तरी धगधगत्या राजकीय संघर्षावर माघारीने शिडकावा टाकला आहे.
काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर राज्यातील सर्वच जागा बिनविरोध होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर आ. पाटील म्हणाले, अशाप्रकारची कोणतीही हालचाल अथवा प्रस्ताव नाही.
तसा योग्य प्रस्ताव आलाच, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच निर्णय होईल.
मुंबईत दोनपैकी एकच जागा निवडून येण्याची शक्यता असल्याने एकाच जागेवर भाजपने अर्ज दाखल केला आहे.
अनावश्यक चुरस निर्माण करणे, हा भाजपचा स्वभाव नाही. राज्यातील इतर जागांबाबत भाजपची निवडून येण्याची क्षमता असल्याने वेगळी स्थिती आहे.