पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी पिशवीबंद दुधाबरोबरच सुट्ट्या दुधाची होणारी विक्री, चिलिंग सेंटरमधील दूध आणि मिठाई दुकानांमधील पदार्थांचीही तपासणी आता दुग्ध व्यवसाय विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने रडारवर घेतली आहे. दुधात भेसळ आढळल्याबरोबर संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दोन्ही विभागाच्या अधिकार्यांना संयुक्त बैठकीत दिल्या आहेत.
राज्यात दुधात होणार्या भेसळीवर 1 ऑगस्टपासून कडक कारवाईची मोहीम संयुक्तरीत्या हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हानिहाय पथके तैनात करण्यात आली असून, दूध भेसळखोरांना अटकाव घालण्यासाठी कडक कारवाईच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यानुसार राज्यभर मोहीम सुरू असून, कारवाईचा आढावा शुक्रवारी (दि. 1) मंत्रालयात झालेल्या ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला.
बैठकीस अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त अभिमन्यू काळे, दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त श्रीकांत शिपूरकर, उपायुक्त प्रशांत मोहोड यांच्यासह अन्न व औषध प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये मुंढे यांनी कारवाईच्या सूचना
दिल्याची माहिती दुग्ध आयुक्तालयातून देण्यात आली. शासनाने अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित केलेली आहे. या समितीने दूध भेसळीचे नियंत्रण करून जिल्हानिहाय कडक मोहीम राबविण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.
जिल्हा अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कर्मचार्यांकडूनच भेसळ रोखण्यासाठी बोटचेपी भूमिका घेतली जात आहे. यासंदर्भात नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. मात्र, एफडीएच्या कर्मचार्यांनी भेसळ दूधतपासणी मोहीम राबविण्यासंदर्भात बैठकीतच अडचणींचा पाढा वाचला. अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करून नमुन्यांच्या तपासण्या करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, एफडीएकडून नकारात्मकता दर्शविण्यात आली. त्यानुसार पोलिस विभागाच्या अधिकार्याने नियोजन करून मोहीम शक्य असल्याचे समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, एफडीएकडून सकारात्मकता दर्शविण्यात आली नाही.
दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि दुग्ध विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या सूचनांनुसार दुधातील भेसळ रोखण्यासाठी राज्यभर कडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत विभागाने 300 ठिकाणी दुधाच्या तपासण्या केल्या असून, 130 नमुने अन्न व औषध प्रशासनच्या शासकीय प्रयोगशाळेत तपासण्यास पाठविले आहेत. त्याच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल.
– श्रीकांत शिपूरकर, दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त, वरळी, मुंबई.
हेही वाचा