पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीची नाबाद ८२ धावांची खेळी, कर्णधार फॅफ डुप्लेसीसच्या ४३ चेंडूमध्ये ७३ धावा आणि बेंगलोरच्या गोलंदाजांची कंजूस गोलंदाजी याच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मुंबईवर दणदणीत विजय मिळवला. हा सामना बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १७१ धावा केल्या आणि बेंगलोर समोर १७२ धावांचे आव्हान ठेवले होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार फॅफ डु प्लेसीस आणि विराट कोहली यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबईचे आव्हान बेंगलोरने १७ व्या षटकात सहजरित्या गाठले. मुंबईकडून कॅमरन ग्रीन आणि अर्शद खानने प्रत्येकी १ विकेट पटकावली.
तत्पूर्वी, बेंगलोरचा कर्णधार फॅफ डू प्लेसीसने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाने मुंबईला मोठी धावसंख्या उभारु दिलेली नाही. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्या असून बेंगलोर समोर १७२ धावांचे आव्हान ठेवले आहे. बेंगलोरच्या गोलंदाजांनी कंजूसपणे गोलंदाजी करत मुंबईची धावसंख्या रोखली.
तिलक वर्माच्या आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला ही धावसंख्या उभारता आली आहे. त्याने ४६ चेंडूमध्ये ८४ धावा केल्या. तिलक वर्माशिवाय मुंबईकडून कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. मुंबईकडून निहाल वढेरा १३ चेंडूमध्ये २१ धावा, सुर्यकुमार यादव १६ चेंडूमध्ये १५ धावा, इशान किशन १३ चेंडूमध्ये १० धावा केल्या. करन शर्माने २, मोहम्मद सिराज, रेस टोपले, आकाश दीप, हर्षल पटेल, मिचेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी १ विकेट पटकावल्या.