Latest

MI vs KKR : कोलकाता नाईट रायडर्ससमाेर मुंबईची दाणादाण

Arun Patil

मुंबई ; वृत्तसंस्था : भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (MI vs KKR) अखेर यशाची चव चाखली असून सोमवारी त्यांनी मुंबई इंडियन्सवर 52 धावांनी आकर्षक विजय संपादला. त्यामुळे अकरा सामन्यांतून कोलकाताचे 10 गुण झाले असून त्यांच्यासाठी हा विजय दिलासादायक ठरला आहे. त्याचवेळी मुंबईला नववा पराभव पत्करावा लागला आहे. त्यांचे अकरा सामन्यांतून 4 गुण झाले आहेत.

विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य समोर ठेवून मैदानात उतरलेल्या मुंबईने पहिल्याच षटकात कर्णधार रोहित शर्माला गमावले. त्याने केवळ दोन धावा केलेल्या असताना टिम साऊथीच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक शेल्डन जॅक्सनने त्याचा झेल टिपला. खरे तर पंचांनी रोहित नाबाद असल्याचा निर्वाळा दिला होता.

मात्र, तिसर्‍या पंचांनी त्याला बाद ठरवले आणि खिन्न मनाने रोहितने तंबूचा रस्ता धरला. यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन याने मग एक बाजू लावून धरली. त्याने 51 धावांची सुंदर खेळी केली. त्याला पॅट कमिन्सने बाद केले आणि त्यानंतर मुंबईचा डाव कोसळायला सुरुवात झाली. मधल्या फळीतील तिलक वर्मा (6) आणि रमणदीप सिंग (12) हे दोघे लवकर बाद झाले. (MI vs KKR)

त्यानंतर टिम डेव्हिड मैदानात उतरला. त्याने लागोपाठ तीन चौकार ठोकले. 11 षटकांचा खेळ संपला तेव्हा मुंबईने 3 गड्यांच्या मोबदल्यात 81 धावा जमवल्या होत्या. डेव्हिड फार काळ टिकला नाही. त्याला वरुण चक्रवर्तीने तंबूत पाठवले. डॅनियल सॅम्सला 1 धाव केलेली असताना पॅट कमिन्सने बाद केले आणि लगेचच त्याने मुरुगन अश्विनला भोपळाही फोडू न देता टिपले. त्यामुळे मुंबईची हालत 7 बाद 102 अशी दयनीय झाली. काही वेळातच कुमार कार्तिकेय धावबाद झाला. त्यानंतर कायरान पोलार्ड आणि जसप्रीत बुमराह हेही धावबाद झाले आणि कोलकाताने 52 धावांनी दणदणीत विजय मिळवला. कोलकाताकडून पॅट कमिन्सने 3 तर आंद्रे रसेलने 2, वरुण चक्रवर्ती व टिम साऊथी यांनी प्रत्येकी एक मोहरा टिपला.

त्यापूर्वी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून कोलकाताला फलंदाजीसाठी पाचारण केले. जसप्रीत बुमराहच्या तुफानी मार्‍यापुढे कोलकाताचे फलंदाज गडबडले. निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून कोलकाताने 165 धावा उभारल्या. अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर यांनी 60 धावांची भक्कम सलामी दिली. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतरही कोलकाताला त्याचा फायदा उठवता आला नाही. व्यंकटेशने तर रहाणेने 25 धावा केल्या. नितीश राणा यानेही 43 धावांची चटपटीत खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यर अपयशी ठरला. 6 धावांवर असताना तो तंबूत परतला. (MI vs KKR)

रिंकू सिंगने नाबाद 23 धावा केल्या. आंद्रे रसेल 9, शेल्डन जॅकसन 5 हे फलंदाज स्वस्तात बाद झाले. पॅट कमिन्स, सुनील नारायण आणि टिम साऊथी यांना तर भोपळाही फोडता आला नाही. या तिघांनाही जसप्रीत बुमराहने तंबूत पाठवले. मुंबईच्या गोलंदाजांनी चांगला मारा करून कोलकाताच्या धावगतीला खीळ घातली. कोलकाताला अवांतर 11 धावा मिळाल्या. त्यात दहा वाईड आणि एका लेग बायचा समावेश होता. मुंबईतर्फे बुमराहने 5, कुमार कार्तिकेयने 2, डॅनियल सॅम्स आणि मुरुगन अश्विन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या सगळ्याच गोलंदाजांनी सुरेख कामगिरी बजावली. कोलकाताकडून या लढतीत 12 चौकार आणि 10 षटकार हाणण्यात आले. मधली फळी कोलमडल्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT