पुढारी ऑनलाईन: आमचं घटनेवर प्रेम आहे, त्यामुळे सगळं काही प्रेमाने होणार, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच १४ फेब्रुवारीनंतर या प्रकरणी सुप्रीम कोर्ट सलग सुनावणी घेणार असल्याचेही राऊत म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर माध्यमांशी राऊत यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रातील ठाकरे शिंदे गटातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार होती. पण या प्रकरणी पुढील सुनावणी ही १४ फेब्रुवारीला होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. १४ फेब्रुवारीला जगभर व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. याच दिवशी राज्याच्या सत्तासंघर्षावर सुनावणी होणार असल्याने, संजय राऊत यांनी या योगायोगाचा मिश्किल शब्दात समाचार घेत, आपले मत माध्यमांसमोर व्यक्त केले.
राज्यातील सत्तासंघर्षावर १४ फेब्रुवारीला या संघर्षावर सुनावणी घेण्यात येईल, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी मोठ्या म्हणजेच सात जणांच्या खंडपीठाकडे करावी, अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने मागच्या सुनावणीत केली होती. यानंतर याप्रकरणी आज सुनावणी होणार होती. मात्र, पुन्हा एकदा ही सुनावणी १४ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटातील प्रमुख नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. यावेळी संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.