Latest

Blue Hole : मेक्सिकोतील ‘ताम जा’ ठरले जगातील सर्वात खोल ‘ब्ल्यू होल’

Arun Patil

मेक्सिको सिटी : मेक्सिकोचे 'ताम जा ब्ल्यू होल' हे जगातील सर्वात खोल 'अंडरवॉटर सिंकहोल' ठरले आहे. त्याच्या तळाचा अद्यापही थांग लागलेला नाही. मेक्सिकोच्या चेटुमल बे जवळ समुद्रात हे खोल विवर आहे. एका नव्या मोजमापानुसार त्याची खोली समुद्रसपाटीपासून 1380 फूट किंवा 420 मीटर इतकी आहे. त्यामुळे आता ते जगातील सर्वात खोल अंडरवॉटर सिंकहोल किंवा 'ब्ल्यू होल' ठरले आहे.

या ब्ल्यू होलचा शोध 2021 मध्ये लावण्यात आला होता. त्यावेळी त्याची जी खोली ठरवण्यात आली होती त्यापेक्षा ते 480 फूट अधिक खोल असल्याचे आता आढळले आहे. दक्षिण चीन समुद्रात 'सांशा योंगल ब्ल्यू होल' किंवा 'ड्रॅगन होल' आहे. त्याची खोली 990 फूट किंवा 301 मीटर आहे. या ब्ल्यू होलला आतापर्यंत जगातील सर्वात खोल 'ब्ल्यू होल' म्हटले जात होते; मात्र आता त्याचा हा विक्रम या मेक्सिकोतील ब्ल्यू होलने मोडला आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'फ्रंटियर्स इन मरीन सायन्स' या नियतकालिकात देण्यात आली आहे.

त्यामध्ये म्हटले आहे की 6 डिसेंबर 2023 मध्ये या ब्ल्यू होलची खोली मोजण्यासाठी स्कुबा डायव्हिंग मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी या विवरातील पर्यावरणाचाही अभ्यास करण्यात आला; मात्र अद्यापही या विवराचा तळ गाठण्यात यश आलेले नाही. त्यामुळे सध्या त्याची जी खोली सांगितली जात आहे, त्यापेक्षाही ते अधिक खोल असू शकते. 'ब्ल्यू होल' म्हणजे किनारपट्टीजवळ समुद्रतळाशी चुनखडी, संगमरवर किंवा जिप्समच्या खडकांमध्ये निर्माण झालेले खोल विवर. पाण्यामुळे खडकांची झीज होऊन असे खड्डे निर्माण होत असतात. बहामासमधील 'डीन्स ब्ल्यू होल', इजिप्तमधील 'दहाब ब्ल्यू होल' बेलिझमधील 'ग्रेट ब्ल्यू होल' ही त्याची काही प्रसिद्ध उदाहरणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT