पुढारी ऑनलाईन डेस्क : #INDvPAKT20 : T20WorldCup : टी 20 विश्वचषक स्पर्धेत आज (दि.23) भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होत आहे. ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ सुमारे एक लाख प्रेक्षकांसमोर आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघांचा या स्पर्धेतील हा पहिला सामना आहे. त्यामुळे या स्पर्धेची सुरुवात विजयाने करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान संघ सज्ज झाले आहेत.
गेल्या टी 20 विश्वचषकातही भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी झाला होता. त्यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या टीम इंडियाने तो सामना 10 विकेटने गमावला होता. मात्र, त्या स्पर्धेनंतर भारतीय संघात बरेच बदल झाले असून गेल्या टी 20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया मेलबर्नच्या मैदानात उतरणार आहे. (#INDvPAK T20WorldCup)
एमसीजी मैदानावरील मागील 5 सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या पाच सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध केलेल्या 175 धावा ही सर्वोच्च धावसंख्या आहे. पहिल्या डावात सरासरी 145 धावा तर दुसऱ्या डावाची सरासरी 140 धावा आहे. या मैदानावर एका डावात सर्वाधिक 184 धावा करण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. या मैदानावर पाकिस्तानची सरासरी 125 धावांची आहे. येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करते. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनी 59 बळी घेतले आहेत. (#INDvPAK T20WorldCup)
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन खेळण्यावर संशय आहे. त्याचवेळी फखर जमान पाकिस्तानसाठी या सामन्यातून बाहेर पडला आहे. दरम्यान, दोन्ही संघाची संभावित प्लेईंग इलेव्हन बाबत बरीच चर्चा सुरू आहे. (#INDvPAK T20WorldCup)
टी 20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ 6 वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने पाच वेळा विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी UAE येथे झालेल्या T20 विश्वचषकात टीम इंडियाला पाकने बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणा-या संघाने पराभवाचा धक्का दिला होता.
दोन्ही संघांमध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये एकूण 11 सामने खेळले गेले आहेत. भारताने 7 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने 3 सामने जिंकले आहेत. 1 सामना बरोबरीत राहिला आहे. यामध्ये भारताने बॉल आऊटमध्ये विजय मिळवला.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन/युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल/मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
सामन्यापूर्वीच पाकिस्तानचा संघ जवळपास निश्चित झाला आहे. शान मसूद दुखापतीतून सावरला असून तो खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचवेळी फखर जमान अजूनही गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला नसल्याने या सामन्यापूर्वी त्याला तंदुरुस्त नसल्याने तो अंतिम संघात नसेल. बाबर आणि रिझवान जोडी डावाची सुरुवात करेल. शान मसूद, शादाब खान आणि मोहम्मद नवाज मधल्या फळीत कमाल करतील. सामना संपवण्याची जबाबदारी हैदर अली आणि आसिफ अली यांच्यावर असेल.