मावळ मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या श्रीरंग बारणे आणि उद्धव ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांच्या रूपाने शिवसेनेच्या दोन गटातच फाईट होणार आहे. मुंबईलगत येणार्या या मतदार संघात ठाकरे आणि शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
या मतदार संघात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणार्या आणि राष्ट्रवादी पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणार्या वाघेरेंनी नुकताच ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या उमेदवारीची घोषणा होत असताना महायुतीत जागावाटपाचा खल सुरू होता. त्यातच मावळात भाजप आणि राष्ट्रवादीकडून तीव्र विरोध झाल्याने बारणेंच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. नुकत्याच शिंदे गटाच्या उमेदवारांच्या यादीमध्ये बारणेंचे नाव जाहीर झाले आणि मावळात दोन्ही शिवसेनेमध्येच लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.
मावळ लोकसभा मतदार संघात गेल्या तीनही निवडणुकीमध्ये शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये श्रीरंग बारणेंना मतदारांनी साथ दिली आहे. मात्र, या निवडणुकीतील गणिते वेगळी आहेत. बारणे हे शिवसेनेकडून धनुष्यबाण चिन्हावर रिंगणात असले, तरी त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार तोफ डागणार आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटावर होणार्या गद्दारीच्या टीकेचा सामना बारणेंना करावा लागणार आहे. भाजप व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची प्रामाणिक साथ मिळविण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर आहे. सत्ताविरोधी लाटेलाही त्यांना सामोरे जावे लागू शकते. 'अबकी बार 400 पार' हा नारा सत्यात उतरविण्यासाठी भाजपने त्यांना मनापासून साथ दिल्यास त्यांचा मार्ग सुकर होऊ शकतो. याउलट सगल दोन वेळा निवडणूक जिंकणार्या बारणेंसारख्या अनुभवी उमेदवाराला सामोरे जाण्याचे आव्हान वाघेरेंसमोर आहे. त्यांना लोकसभा निवडणूक लढविण्याचा अनुभव नाही. त्यामुळे कमी वेळामध्ये स्वत: व मशाल चिन्ह पोहोचण्यासाठी त्यांची दमछाक होणार आहे.
मावळ मतदार संघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी हे सहा विधानसभा मतदार संघ येतात. यातील तीन मतदार संघात भाजपचे प्राबल्य आहे. दोनमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे, तर अपक्ष व शिवसेनेचा प्रत्येकी एक आमदार आहे. आमदारांची संख्या लक्षात घेता लोकसभा मतदार संघात महायुतीची ताकद आहे. मात्र, निवडणुकीतील मुद्दे आणि महायुती किती एकसंघ राहते, यावर बारणेंच्या विजयाची गणिते अवलंबून आहेत.