बारामती; पुढारी वृत्तसेवा : विवाहितेने बलात्काराची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल केल्यानंतर तिचे अश्लिल, अर्धनग्न फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत तिच्या पतीला पाठविल्याचा प्रकार बारामतीत घडला. या प्रकरणी पोपट धनसिंग खामगळ (रा. खामगळवाडी, ता. बारामती) याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत महिलेने फिर्याद दिली.
पोपट खामगळ हा तिचे फोटो व्हायरल करेन अशी धमकी देत तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक संबंध करत होता. त्यामुळे फिर्यादीने त्याच्या विरोधात ७ एप्रिल रोजी बारामती शहर पोलिस ठाण्यात बलात्काराची फिर्याद दाखल केली. त्यानंतर दि. ११ रोजी ती घरी असताना तिचे पती घरी आले. त्यांनी तिचे आणि पोपट खामगळ या दोघांचे एकत्र असलेले फोटो त्यांना मोबाईलवर पाठविल्याचे दाखविले.
त्यानंतर दि. १४ रोजी रात्री सव्वा दहा वाजता पोपट खामगळ याने महिलेच्या पतीच्या मोबाईलवर तिचे अश्लिल, अर्धनग्न अवस्थेतील फोटो पाठवले. तसेच हे फोटो इन्टाग्राम खात्यावरून व्हायरल केले आहेत. आणखी विचित्र अवस्थेतील फोटो माझ्याकडे असून ते व्हायरल करेन अशी धमकी त्याने दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.