Latest

उद्योग : 45 कोटी हवाई प्रवाशांची बाजारपेठ

Arun Patil

भारतीय नागरी उड्डाण बाजारपेठ 2030 पर्यंत जगातील सर्वात मोठी म्हणून ओळखली जाणार आहे. 45 कोटी प्रवाशांपर्यंत तिचा विस्तार झाला असेल. म्हणूनच या बाजारपेठेतील आपला हिस्सा वाढवण्यासाठी एअर इंडिया आणि विस्तारा यांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय झाला, असे म्हणता येते. भारतात हवाई प्रवास क्षेत्राची वाढ का होत आहे, याचा आढावा घेणे म्हणूनच गरजेचे ठरते.

भारतीय नागरी उड्डाण बाजारपेठ 2030 पर्यंत जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. येत्या दशकात तिची 8 ते 10 टक्के चक्रवाढ वार्षिक वृद्धी दराने (सीएजीआर) वाढ अपेक्षित आहे. 2030 पर्यंत 45 कोटी प्रवाशांपर्यंत तिचा विस्तार झाला असेल, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतीय नागरी उड्डाण बाजारपेठेतील आपला हिस्सा वाढवण्यासाठीच एअर इंडिया आणि विस्तारा या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. इंडिगो ही सध्या 54 टक्के हिश्श्यासह सर्वात मोठी एअरलाईन कंपनी म्हणून भारतात ओळखली जाते. इंडिगोसारख्या प्रतिस्पर्ध्याचा सामना करण्यासाठी एक मोठी कंपनी उभी केली जाईल, असे टाटा समूहाने नोव्हेंबरमध्येच स्पष्ट केले होते. आता विलीनीकरणानंतर एअर इंडिया नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत सादर होण्यासाठी सज्ज होत आहे. टाटा समूह त्यासाठी नवनव्या कल्पना राबवत आहे.

नव्या एअर इंडियाचा देशांतर्गत बाजारपेठेतील हिस्सा सुमारे 25 टक्के इतका होईल, ज्यामुळे ती भारतातील दुसरी सर्वात मोठी एअरलाईन कंपनी बनेल. यात 40 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी असतील. कंपनीच्या ताफ्यात बोईंग 787 ड्रीमलाईनर तसेच 'विस्तारा'च्या एअरबस ए 320 निओ अशी 200 पेक्षा अधिक विमाने असतील. देश आणि विदेशातील एकूण 150 पेक्षा अधिक ठिकाणी प्रवाशांना सेवा दिली जाईल. यात युरोप, मध्य पूर्वेसह आग्नेय आशियातील काही ठिकाणांचा समावेश आहे. अमेरिकेसह कॅनडासाठी नवीन मार्ग आणि उड्डाणे सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरी उड्डाण बाजारपेठ नेमकी कोणत्या कारणाने विस्तारत आहे, एअर इंडियाने बोईंग या कंपनीबरोबर जो ऐतिहासिक असा विमान खरेदी करार केला, त्याचे अमेरिकालाही कोणते फायदे झाले, एअर इंडिया आणि विस्तारा यांच्यातील विलीनीकरण यांची माहिती घेणे क्रमप्राप्त ठरते.

भारतीय बाजारपेठ

भारतीय नागरी उड्डाण बाजारपेठ सध्या अमेरिका आणि चीन यांच्यापाठोपाठ जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. तथापि, यात होणारी वाढ 2030 पर्यंत तिला जगातील पहिल्या क्रमांकाची बाजारपेठ अशी नवी ओळख करून देणारी ठरणार आहे. 450 दशलक्ष प्रवाशांपर्यंत तिचा विस्तार झाला असेल. भारतातील वाढता मध्यमवर्ग तिच्या वाढीसाठी कारणीभूत ठरत आहे. 2022 मध्ये 340 दशलक्षवरून 2030 पर्यंत 536 दशलक्षपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. या वाढत्या मध्यमवर्गाकडे हवाई प्रवासावर खर्च करण्यासाठी पुरेसे अधिक उत्पन्न असेल. देशात कमी किमतीच्या वाहकांनी हवाई प्रवास परवडणारा बनवला आहे. यामुळेही विमान प्रवासाची मागणी वाढली आहे. नवीन विमानतळ विकसित करण्यासाठी तसेच विद्यमान विमानतळांचा विस्तार करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. त्यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारण्याबरोबरच हवाई प्रवास सुलभ होत आहे. भारतीय विमान कंपन्या त्यांचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क विस्तारत आहेत. त्यामुळेही प्रवाशांना भारतात ये-जा करणे तुलनेने सोपे झाले आहे. या क्षेत्राच्या वाढीमुळे व्यवसायांसाठी अनेक संधी निर्माण होत असून, विमान कंपन्यांबरोबरच विमानतळ आणि संबंधित हवाई वाहतूक व्यवसायांत वाढ होईल. भारतीय अर्थव्यवस्थेवर अर्थातच याचा सकारात्मक परिणाम होईल. त्यातूनच रोजगार निर्मितीला चालना मिळेल.

पर्यटन व्यवसायातही वाढ होईल. देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुधारण्यास तसेच विदेशी गुंतवणुकीसाठी भारत अधिक आकर्षित ठिकाण होण्यास त्याची मदत होईल. नवीन तंत्रज्ञानाचा विकास, ई-कॉमर्स क्षेत्राची होत असलेली वाढ, ज्यामुळे हवाई मालवाहतुकीची मागणी वाढत आहे. भारतातील पर्यटन स्थळे लोकप्रिय होत असल्याने पर्यटनाचे वाढलेले महत्त्व ही थेट कारणे आहेत. देशांतर्गत प्रवासी वाहतूक 11 टक्के सीएजीआरने वाढण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक 9 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे. कार्गो वाहतूकही 6 टक्के दराने वाढेल. नवी दिल्ली, मुंबई, बंगळूर, चेन्नई आणि हैदराबाद ही प्रमुख विमानतळे म्हणून ओळखले जात आहेत. इंडिगो, स्पाईसजेटसह एअर इंडिया या देशांतर्गत प्रमुख कंपन्या आहेत. (विस्तारा आता एअर इंडियात विलीन होत आहे म्हणून तिचे नाव यात नोंदवले नाही) सरकारने 2030 पर्यंत 1.8 अब्ज प्रवासी तसेच 100 दशलक्ष टन कार्गो हाताळण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

'बोईंग'सह अमेरिकेला लाभ

एअर इंडियाने बोईंग आणि एअरबससोबत 70 अब्ज किमतीचा 470 विमाने खरेदी करण्याचा जो करार केला, तो वाहतुकीच्या इतिहासातील सर्वात मोठा म्हणून ओळखला जातो. 40 एअरबस ए 350, 20 बोईंग 787 आणि 10 बोईंग 777-9 एस यांचा यात समावेश आहे. 210 एअरबस ए 320 तसेच 321 निओ आणि 190 बोईंग 737 मॅक्स ही विमाने एअर इंडिया खरेदी करत आहे. या करारामुळे अमेरिकेतील 44 राज्यांमध्ये दहा लाख इतके रोजगार निर्माण होतील, असे म्हटले जाते. त्याचवेळी भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक द़ृढ होण्यास त्याची मदत झाली, असेही मानले जाते. हा करार एअर इंडियाला देशांतर्गत बाजारपेठेसह आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्या सेवांचा विस्तार करण्यास मदत करणारा ठरणार आहे. इंडिगो 54.9 टक्क्यांसह देशांतर्गत बाजारपेठेवर आपले नियंत्रण ठेवते. देशातील वाढती वाहतूक उद्योगातील संधी लक्षात घेऊनच एअर इंडियाने हा करार केला.

एअर इंडिया-विस्तार

एअर इंडियाला अनेक विमान कंपन्यांकडून स्पर्धेचा सामना करावा लागतो. 250 विमानांचा ताफा आणि बाजारपेठेतील 54 टक्के हिस्सा यासह इंडिगो ही प्रमुख स्पर्धक कंपनी म्हणून ओळखली जाते. म्हणूनच एअर इंडियाने विस्तारासह विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भातील घोषणा 29 नोव्हेंबर 2022 रोजी टाटा समूहाने केली होती. मार्च 2024 पर्यंत त्यासंबंधी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. कमी किमतीची वाहक कंपनी म्हणून एअर इंडिया ओळखली जाईल. एअर इंडियाची स्थापना 1932 मध्ये करण्यात आली होती. नवी दिल्ली येथे मुख्यालय असणार्‍या एअर इंडियाची मूळ मालकी ही टाटा समूहाकडेच होती. देशांतर्गत बाजारपेठेत तिचा हिस्सा 15 टक्के इतका आहे. जेआरडी टाटा यांनी तिची स्थापना केली.

प्रारंभी टाटा एअरलाईन्स म्हणून ती काम करत होती. 1953 मध्ये तिचे राष्ट्रीयीकरण करण्यात आल्यानंतर 'एअर इंडिया' असे नामकरण करण्यात आले होते. भारतीय वाहतूक उद्योगातील अग्रणी कंपनी म्हणून ती प्रसिद्ध आहे. आपल्या ताफ्यात जेट विमानाचा समावेश करणारी पहिली आशियाई कंपनी ठरली. 2021 मध्ये खासगीकरणाअंतर्गत तिची मालकी टाटा समूहाला दिली गेली. जगभरात तिचा लौकिक कायम असून, एअर इंडियाने प्रवास करणे हे प्रतिष्ठेचे मानले जाते. विस्तारा ही टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्स यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून 2013 मध्ये स्थापन केली गेली. 9 जानेवारी 2015 रोजी दिल्ली ते मुंबईदरम्यान पहिले उड्डाण झाले.

आज ती देश-विदेशातील 57 ठिकाणी सेवा पुरवते. उच्च दर्जाची सेवा देणारी कंपनी, असा तिचा लौकिक झाला आहे. एअर इंडियासह विस्तारालाही वाढत्या स्पर्धेला सामोरे जावे लागले. काही वर्षांतच विस्ताराने स्वतःचे नाव विमान वाहतूक क्षेत्रात चांगल्या कामगिरीने नोंदवले आहे. विस्ताराच्या विलीनीकरणानंतर सिंगापूर एअरलाईन्सही एअर इंडियाचे 25 टक्के समभाग विकत घेणार आहे. ज्यामुळे देशातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय वाहक कंपनी म्हणून एअर इंडिया ओळखली जाईल. तसेच देशातील ती दुसर्‍या क्रमांकाची वाहक कंपनी ठरेल. टाटा समूहाच्या अंदाजानुसार, भारताच्या नागरी विमान वाहतूक बाजारपेठेतील उलाढाल 900 दशलक्ष डॉलर इतकी आहे. यातील वाढीच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ती ओळखली जाणार आहे.

मार्च 2023 नुसार इंडिगो 285 विमानांसह देशातील प्रथम क्रमांकाची कंपनी ठरली आहे. स्पाईसजेट 160 विमानांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. एअर इंडिया 125 विमानांसह तिसर्‍या क्रमांकाची कंपनी असून, विस्ताराकडे 49 विमाने आहेत. याशिवाय अन्य काही छोट्या कंपन्या भारतात सेवा देत आहेत. तथापि, बाजारपेठेवर कमी किमतीच्या वाहक कंपन्यांचे वर्चस्व आहे. सरकार प्रादेशिक कनेक्टेव्हिटीच्या विकासाला चालना देत आहे. पायाभूत सुविधांच्या विकासातही गुंतवणूक करत आहे. म्हणूनच 2030 पर्यंत ती जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पुढे येणार आहे. म्हणूनच एअर इंडिया आणि विस्तारा या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया का महत्त्वाची ठरते, हे लक्षात येते. भारत आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येत असतानाच, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा उजळवण्याचे काम विमान कंपन्या करत आहेत, हे मान्य करावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT