Latest

आता मॉरिशसमध्ये दिसणार मराठी ग्रंथालय; कोकण मराठी साहित्य परिषदेकडून ५०० पुस्तकं भेट

backup backup

रत्नागिरी; दीपक कुवळेकर : एखादं काम समर्पण भावनेने केले तर किती मोठं होऊ शकतं. सातासमुद्रापार जाऊ शकते. त्याची व्याप्ती, विस्तार किती मोठा होवू शकतो, हे कोकण मराठी साहित्य परिषदेने दाखवून दिलं आहे. मराठी भाषेचं ग्रंथालय आता मॉरिशसमध्ये दिसणार आहे. एकूण 5 हजार पुस्तकं कोमसाप देणार असून तेथील 500 पुस्तकं मॉरिशसला रवाना झाली आहेत.

कोकण मराठी साहित्य परिषद आणि मराठी स्पिकिंग युनियन मॉरिशसअंतर्गत मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरिशस मराठी कल्चर सेंट्रल ट्रस्ट यांच्या सहसंयोजनाने व महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित 17 वे आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन काही महिन्यांपूर्वी मॉरिशस येथे झाले. या संमेलनासाठी महाराष्ट्रातून 100 साहित्यप्रेमी मॉरिशसला गेले होते. मॉ रीशसमधील मराठी भाषिकांची पाचवी पिढी आता तेथे राहत आहे. शैक्षणिक, साहित्य, राजकारण, शासकीय सेवा अशा विविध ठिकाणी तेथे मराठी माणूस काम पाहत आहे. सातासमुद्रापार अनेक पिढ्या महाराष्ट्रापासून दूर राहूनही मराठी मातीशी असलेल्या ओढीने मॉरिशसमध्ये मराठी साहित्य संमेलन घेऊन आपली संस्कृती, नाते जपण्याचा प्रयत्न मॉरिशसमधील मराठी भाषिक करत आहेत.

या संमेलनावेळी तेथील मराठी माणसं कोकण मराठी साहित्य परिषदेच्या प्रेमात पडली. यावेळी त्यांनी आपल्या येथे ग्रंथालय काढावं, अशी मागणी कोमसापकडे केली. याला कोमसापचे विश्वस्तप्रमुख रमेश कीर आणि केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी त्वरित होकार दिला. त्यानुसार कार्यवाहीलासुद्धा लगेचच सुरूवात केली. तब्बल 500 पुस्तके सुरूवातीला त्यांनी भेट दिली.

सध्या या पुस्तकाच्या प्रेमात मॉरिशसची मराठी लोकं पडली आहेत. 5000 पुस्तकं मिळाल्यानंतर तिथे छोटंसं ग्रंथालय उभं राहणार आहे. एकंदरीत कोमसापचं कार्य हे सातासमुद्रापार गेलं आहे. यातून आंतरराष्ट्रीय संस्कृतीची देवाणघेवाण होणार आहे.

मॉरिशसमध्ये मराठी कल्चर चांगलं आहे, हे आम्हाला 17 व्या साहित्य संमेलनावेळी अनुभवायला मिळाले. आमच्याकडे तेथील लोकांनी मराठी ग्रंथालयाची मागणी केली. आम्हालाही ती आवडली. आम्ही 5000 पुस्तकांचे ग्रंथालय उघडणार आहोत. याची सुरूवातही 500 पुस्तकं देवून केली आहे.
– नमिता कीर, केंद्रीय अध्यक्षा, कोकण मराठी साहित्य परिषद.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT