मुंबई, पुढारी ऑनलाईन : 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) वर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या धाकट्या भावाचे नुकतेच निधन झाले. ओमकार नेमळेकर (Omkar Nemlekar) असे अपूर्वाच्या भावाचे नाव आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी ओमकारचे निधन झाल्याने अभिनेत्रीला मोठा धक्का बसला आहे. अपूर्वाने आपल्या इन्स्टाग्रामवर यासंदर्भात दु:खद भावना व्यक्त केल्या आहेत. अपूर्वाच्या या पोस्टनंतर अनेक मराठी कलाकारांनी अभिनेत्रीच्या भावाला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अपूर्वाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने आपल्या भावाबरोबरचे काही फोटोजही शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये अपूर्वाने म्हटलं आहे की, 'माझ्या लाडक्या भावा जिथे असशील तिथे आनंदात राहा. कधीकधी आयुष्यात अशी दुःख सहन करावी लागतात. अशा व्यक्तींची जागा कुणीच भरून काढू शकत नाही. तुला गमावणं ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात दुखःद गोष्ट आहे, ज्यासोबत मला संपूर्ण आयुष्य काढावं लागणार आहे. तुला गुडबाय म्हणणं मला जमणार नाहीये. तुला जाऊ द्यायला माझं मन तयार नाही. मी तुझ्यासोबत आणखी एक दिवस किंवा एक सेकंद घालवण्यासाठी काहीही द्यायला तयार आहे. पण, मी बिनशर्त प्रेमावर विश्वास ठेवायला शिकले आहे. कारण मृत्यूबद्दलची एक गहन गोष्ट म्हणजे प्रेम कधीच मरत नाही. काही बंध कधीच तोडता येत नाहीत.'
'कारण जरी तुम्ही येथे शारीरिकदृष्ट्या नसलास तरी तुझं हृदय माझ्याजवळ आहे. ते कायम माझ्याजवळच राहील. कधीतरी आपण पुन्हा भेटू आणि आपण यापुढे वेळ किंवा जागेने वेगळे होणार नाही. पण त्या दिवसापर्यंत, तू अजूनही माझ्यासोबत आहेस हे आठवून माझ्या मनाला शांती मिळेल. मी तुझ्यावर नेहमीच प्रेम केलंय, करतेय आणि कायम करेन. आशा आहे की, आपण पुन्हा कधीतरी नक्कीच भेटू.'
अपूर्वाच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी अभिनेत्रीला भावाच्या मृत्यूचं कारण विचारलं आहे. यावर अभिनेत्रीने उत्तर देत त्याला हृदयरोगाचा झटका आला आणि यातचं त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.