जालना, पुढारी वृत्तसेवा : अंतरवाली सराटी येथे आंदोलनस्थळी शनिवारी आंदोलकांना भेटण्यासाठी शरद पवार गेले असता, त्यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. संतप्त आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करीत, '40 वर्षे तुम्ही काय केले?' असा सवाल केला. काही अज्ञातांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. तसेच गाड्यांना लाथा मारून नासधूस करण्याचा प्रयत्न केला. वाढता जमाव पाहता पोलिसांनी तेथून काढता पाय घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी शुक्रवारी अमानुष लाठीमार केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. त्यानंतर दुसर्या दिवशी शनिवारी प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण उपोषणस्थळाला भेट दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उपोषणस्थळी येताच मराठा आंदोलकांचा संताप अनावर झाला. त्यांनी शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली. तसेच, तुम्ही 40 वर्षे मराठा आरक्षणासाठी काय केले? असा खडा सवाल पवारांना केला. जमाव संतप्त झाल्याने पोलिसांनी पवारांना सुरक्षितपणे बाहेर काढले.