कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही दिग्गज नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटातील काहींचा यामध्ये समावेश आहे. या सर्वाचा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे खा. धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
दि. 27 रोजी फडणवीस कोल्हापुर दौर्यावर येणार असून त्यावेळी हे पक्षप्रवेश करण्याचे नियोजन असल्याचेही ते म्हणाले. कोल्हापुरातही भाजपला लोकांची साथ मिळत असून जनाधार वाढत असल्याचे सांगून महाडिक म्हणाले, गेल्या वर्षभरापासून भाजपमध्ये इतर पक्षातील लोकांची येण्याची इच्छा आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. ठाकरे गटासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी भाजपात येण्याची उत्सुकता दाखविल्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलणी केली. त्यानंतर त्यांनी भाजप प्रवेशाची तयारी दाखविली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोदी ऽ 9 या कार्यक्रमाच्या निमित्ताने 27 जून रोजी कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्या दौर्यात अनेक नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचे नियोजन केले आहे. फडणवीस यांच्या उपस्थितीत हे दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेतेही येण्यास इच्छुक आहेत. मात्र त्यांना पक्षात घ्यायचे की नाही हे नेतृत्व ठरवणार आहे. असे महाडिक यांनी सांगितले.