मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः अंतरवाली सराटीत आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी (दि. 13) केल्यामुळे त्यांच्या उपोषणाने निर्माण झालेला पेच आणखीनच बिकट झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून त्यांच्या अंतरवाली सराटीच्या दौर्याचा कार्यक्रम जाहीर झाला आणि काही वेळातच तो रद्दही झाला, त्यामुळे जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे न घेण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, आज (दि.१४) मुख्यमंत्री जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार देखील असणार आहेत.
अंतरवाली सराटी येथे गेल्या सोळा दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांनी उपोषण सोडण्याची सशर्त तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ आणि खा. उदयनराजे भोसले आणि माजी खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत सुधारित अध्यादेशाचे पत्र द्यावे, अशा अटी त्यांनी घातल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंगळवारी रात्री उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जरांगे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी सामंत यांनी त्यांचे मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून दिले. त्यानंतर चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगून, उपोषण मागे घेण्याबाबत बुधवारी निर्णय घेऊ, असे जरांगे-पाटील यांनी सांगितले होते.
आपले उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री येणार असल्याचा दावा जरांगे-पाटील यांनी केला होता. बुधवारी सकाळी मुख्यमंत्री कार्यालयातून दौर्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. परंतु, दुपारी मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर झाला. त्यानुसार शिंदे हे विमानाने छत्रपती संभाजीनगर येथे व तेथून हेलिकॉप्टरने अंकुशनगरला व पुढे अंतरवालीत येणार असल्याचे नमूद केले होते. प्रशासकीय पातळीवर दौरा अधिकृत जाहीर झाल्यानंतर त्याची तयारी सुरू असतानाच सायंकाळी पाच वाजता दौरा रद्द झाल्याचा संदेश धडकला.
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक घेतली. त्यानंतर घेतलेल्या संयुक्तपत्रकार परिषदेच्या ठिकाणी येताना मुख्यमंत्री शिंदे 'आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं आणि निघायचं,' असे म्हणताना एका व्हिडीओत दिसतात. त्यावेळी अजित पवार 'येस, येस,' असे म्हणत आहेत. त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्र्यांना माईक चालू आहे, याची जाणीव करून देतात. त्यावर अजित पवार यांनीही त्यातून आवाज जात असल्याचे सांगितले. या तिघांमध्ये झालेल्या संभाषणाचा व्हिडीओ बुधवारी व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणावर गंभीर नसल्याची टीका केली आहे. मात्र, हा राजकीय खोडसाळपणा असल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.