वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : मंत्री गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांना येरवड्यातील रुग्णालयात दाखल करावे, अशी टीका मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधताना केली.
रविवारी भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्याला जरांगेंनी सोमवारी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, मी आतापर्यंत कधीच दारूला स्पर्शही केलेला नाही. माझी नार्को चाचणी केली जावी. जर मी मद्यपान केल्याचे त्यात स्पष्ट झाले, तर जिवंत समाधी घ्यायला तयार आहे. मात्र, जर हे सिद्ध झाले नाही तर भुजबळांनी समाधी घ्यावी, असे आव्हान त्यांनी दिले. भुजबळ यांचे ऐकून धनगर, वंजारी बांधवांनी आमच्याशी वाद घालू नये. आतापर्यंत 72 हजार कुणबी नोंदी सापडल्या असल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यामागे शरद पवारच कारणीभूत असल्याचा आरोप देवेंद्र फडणीस यांनी केला. यावर जरांगे म्हणाले, आतापर्यंत आम्हाला आरक्षण न मिळण्याला सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेतेही तितकेच जबाबदार आहेत.