मांजरी : मांजरी बुद्रुक येथील मुळा-मुठा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मांजरी बुद्रुक आणि मांजरी खुर्द या दोन्ही गावांना जोडणार्या नदीवरील पुलाला पाणी टेकले असून, पावसाची संततधार अशीच राहिल्यास पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत वाहतूक सुरू राहिली, तर अपघाताची शक्यता असल्याने प्रशासनाने दोन्ही बाजूंची या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे.सहा दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शहर व उपनगरातून वाहणार्या ओढ्या-नाल्यातील पाणी नदीत मिसळत आहे. त्यामुळे मुळा-मुठा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.
मंगळवारी दिवसभरात नदीची पातळी 7 फुटांनी वाढली आहे. सध्या पुलाच्या खालील भागाला पाणी टेकले असले, तरी नदीवरील पूल सबमर्शिबल असल्याने पाण्याची अजून दोन- तीन फूट पातळी वाढल्यास पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. मांजरी खुर्द पुलाजवळ पोलिस बंदोबस्त ठेवला असुन, या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. मगरपट्टा-मुंढवा-खराडी मार्ग मांजरी खुर्द या मार्गावरून वाहतूक सेवा सुरू आहे. मांजरी-मांजरी खुर्द पुलावरील जेसीबी मशिन आडवी लावली व बॅरिकेडसही लावली आहेत.