नसरापूर, पुढारी वृत्तसेवा: शेताच्या वादावरून एकमेकांवर हत्याराने घाव घालण्याची घटना अनेकवेळा घडते. मात्र, शेताच्या वादावरून शेतात भिजणी काढण्यासाठी आलेल्या महिलेला विजेच्या तारा अंथरून आणि शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न करण्याची पहिलीच घटना राज्यातील भोर तालुक्यात घडली. सुदैवाने महिला यातून बचावली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. सिनेस्टाईल मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
विजय निवृत्ती सुर्वे (वय ४२, रा. भोंगवली, ता. भोर) असे आरोपीचे नाव असून ही घटना भांबवडे (ता. भोर) गावच्या हद्दीत गुरुवारी (दि. २४) घडली. हिराबाई दत्तात्रय कापरे (वय ५८) असे विजेचा धक्का लागून बचावलेल्या महिलेचे नाव आहे. महिलेला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक घटनेबाबत राजगड पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगाव, पोलिस कर्मचारी व महावितरणाचे कर्मचारी यांनी पाहणी करून पंचनामा केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, भांबवडे गावामधील शेतजमीनवरून फिर्यादी व आरोपी यांचा जुना वाद आहे. २२ नोव्हेंबर रोजी वायरचा बंडल घेऊन विजय सुर्वे शेतातील खांबाकडे गेला होता. त्याचे स्वतःचे काहीतरी काम असेल असे समजून फिर्यादीच्या पतीने त्याकडे दुर्लक्ष केले होते. दुसऱ्या दिवशी महिला शेतात असताना त्यांना सुर्वे याने 'तू माझ्या विरुद्ध कोर्टामध्ये दावा दाखल केला आहे ना? मी पण तुला याच शेतामध्ये समाधी देतो, अशी धमकी दिली होती. त्यानंतर गुरुवारी शेतात ज्वारी भिजवत असताना महिलेला शॉक लागून त्या शेजारच्या कोरड्या सरीत फेकल्या गेल्या. यामुळे या घटनेत त्या सुदैवाने बचावल्या.
आरोपी सुर्वे याने फिर्यादी महिला व तिच्या पतीला वारंवार जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शॉक लागल्यानंतर नातेवाईक व वायरमन यांनी पाहणी केली असता सरीमधील वायर ही शेजारी असलेल्या उसाच्या शेतातील खांबावरून आकडा टाकून ती लपवत-लपवत फिर्यादीच्या ज्वारी पाणी देण्याच्या ठिकाणापर्यंत आणून जोडली असल्याचे उघड झाले.