पुणे, पुढारी वृत्तसेवा: लग्नानंतर प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणातून प्रेयसी व तिच्या पतीला अॅसिड टाकून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घरात जाऊन शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी 32 वर्षीय आरोपीच्या विरुद्ध विनयभंग, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 26 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना मार्च 2021 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत इंदीरानगर खड्डा गुलटेकडी परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपीमध्ये लग्नापुर्वी प्रेमसंबंध होते. दरम्यान लग्नानंतर देखील आरोपी तरुणीला त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्यास सांगून शरीरसंबंधाची मागणी करत होता. मात्र, त्याला तरुणीने नकार दिला. तरी देखील आरोपी तिच्या इच्छेविरुद्ध तरुणीचा पाठलाग करून शरीर संबंध न ठेवल्यास तिला व तिच्या पतीला अॅसिड टाकून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच, फिर्यादी तरुणी घरात एकटीच असताना आरोपी घरात शिरला, त्याने तिला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दिली.