डोंबिवली 
Latest

‘आईला काय सांगत आहेस, तुला आता सोडतच नाही’ म्हणत धारदार चाकूने केला पत्नीचा खून; पतीला हडपसर पोलिसांकडून बेड्या

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: दारूच्या नशेत पत्नीला पट्ट्याने मारत असल्याची तक्रार आईला केल्याच्या कारणावरून पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून करत मध्यस्ती करणार्‍या मेव्हणीवर देखील वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री साडेसतरानळी येथे घडला. याप्रकरणी पत्नीचा खून करणार्‍या पतीला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हनुमंत धोंडीबा पवार (22, रा. सुर्यवंशी बिल्डींग, तोरडमल वस्ती, साडेसतरानळी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. नंदिनी हनुमंत पवार (19) यांचा खून करण्यात आला तर मेव्हणी कोमल वैजनाथ लांडगे (22) यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत मृत नंदिनी यांच्या आई माणिका शिवाजी कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतेच नंदिनी आणि हनुमंत यांचे लग्न झाले होते. त्यांना सहा महिन्यांची मुलगी आहे. तिला सांभाळण्यासाठी नंदिनी यांची आई तिच्यासोबत राहत होती. तसेच मोठी तिची मोठी बहीण तेथेच राहण्यास आहे. हनुमंत हा बिगारी काम करत करतो. परंतु त्याला दारूचे व्यसन असल्याने तो पत्नीला वारंवार मारहाण करत होता. घटनेच्या दिवशी मंगळवारी रात्री हनुमंत हा नंदीणीला पट्ट्याने मारहाण करत असताना ती तिच्या आईला त्याबद्दल सांगत होती.

याच रागातून दारूच्या नशेत त्याने 'आईला काय सांगत आहेस, तुला आता सोडतच नाही' म्हणत घरातील धारदार चाकूने छातीवर, पोटावर वार करून तिचा खून केला. या दरम्यान बहीणीला वाचविण्यासाठी गेलेल्या कोमल यांच्यावरही हनुमंत यांनी वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न करत गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, निरीक्षक अरविंद गोकुळे, विश्वास डगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त सोमनाथ पडसळकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT