इंदापूर, पुढारी वृत्तसेवा: "तु माझ्यासोबत नांदायला का येत नाही? तुला आता जिवंत ठेवत नाही" असं म्हणतं हातातील ऊस तोडण्याच्या कोयत्याने पतीने पत्नीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे घडली. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या सासरवाडीच्या मंडळींवर देखील त्याने हल्ला चढवला.
या संदर्भात शुभम शिवाजी शेलार (वय 23, रा. पळसदेव, ता. इंदापुर) यांनी इंदापूर पोलिसांत फिर्याद दिली असून इंदापूर पोलीसांनी जनार्धन गोविंद गाडे (रा. न्हावरा गुनाट वाहिर जि. पुणे) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी २६ ऑगस्ट रोजी आरोपी हा रात्री फिर्यादी यांच्या पळसदेव येथील घरी आला. त्याने पत्नीला शिवीगाळ करत तु माझ्या सोबत नांदायला का येत नाही? तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणत हातातील ऊस तोडण्याच्या कोयत्याचा पत्नीला जिवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे पत्नी घरात कोसळली गेली.
दरम्यान फिर्यादीने जनार्दन गाडे यांच्या हातातून कोयता घेत असताना गाडे याने फिर्यादीच्या डावे हाताच्या पंजावर, बोटावर तसेच उजव्या हाताच्या पोटरीवर वार करुन फिर्यादीला गंभीर जखमी केले. तो रक्तबंबाळ झाल्याने फिर्यादीचे आई-वडील हे मुलाला सोडविण्यासाठी गेले असता जनार्धन गाडे याने त्यांच्या डाव्या हाताच्या तळव्यावर आणि मनगटावर वार करून त्यांनाही गंभीर जखमी केले. आई या पतीला सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांच्याही पाठीत कोयता उलटा मारुन त्यांना ही दुखापत केली. तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने तुम्ही सर्वजण आता माझ्या तावडीतून वाचला आहेत, परंतु पुढे माझ्या तावडीतुन वाचणार नाही अशी धमकी देऊन तो पळून गेला. या गुन्ह्याचा तपास प्रभारी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश माने करीत आहेत.