Latest

वेड लावणारा धबधब्यांचा स्वर्ग…‘माळशेज घाट’

Arun Patil

ठाणे, दिलीप शिंदे : पावसाळ्यात धुक्यांशी लपंडाव खेळण्याचा आनंद लुटण्याचे ठिकाण म्हणजे कल्याण-नगर रस्त्यावरील माळशेज घाट होय. सह्याद्रीच्या भव्य रांगांनी नटलेल्या घाटातील हिरवागार निसर्ग हा डोळ्यांचे पारणे फेडतो. घाट रस्त्याकिनारी वाहणारे असंख्य धबधबे म्हणजे जणू धबधब्यांचा स्वर्ग, बहरलेली दुर्मीळ फुले, विदेशी पक्षांचा किलबिलाट, दरीतून वर फिरणारे दाट धुके, हिरवी शालू पांघरलेला डोंगर-दर्‍यांचा परिसर हा पर्यटकांना वेड लावतो. त्याच ओढीने पर्यटकांच्या तोबा गर्दीने घाट परिसर गजबजून जातो.

माळशेज घाट हा पावसाळ्यातील प्रवाशांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. दरवर्षी माळशेजवरील अनुभूती ही निराळीच ठरते. मुसळधार पाऊस, सर्व काही आच्छादून टाकणारे सकाळचे धुके, हवेतील हलकीशी थंडी, काही क्षणार्धात आपल्या अंगाला स्पर्शून जाणारी धुक्यांची चादर आणि डोंगरावर भरून येणार्‍या ढगांच्या वैभवातून वाहणारे धबधबे हे पर्यटकांना मोहून टाकतात. जणू हाच स्वर्ग आहे, याची, अनुभूती अनुभवायला मिळते.

कसे जाता येईल…

वर्षभर कोरडा असलेल्या या घाट परिसरात पावसाच्या आगमनाने चमत्कारीक बदल घडून आलेले दिसतात. असा हा मोहित करणारा माळशेज घाट मुंबईपासून 126 कि.मी. व कल्याणपासून 85 कि.मी अंतरावर असून पुण्यापासून तो 118 कि.मी लांब आहे. मुंबई-ठाणे-कल्याण-मुरबाड- टोकावडे मार्गे खासगी वाहनांनी माळशेज घाट गाठता येते. काही जण कल्याणपर्यंत रेल्वेने जातात आणि कल्याणहून बस अथवा खासगी वाहनांनी माळशेज गाठतात.

पुण्याहून चाकण-राजगुरूनगर-पेठ -मंचर-नारायणगाव-जुन्नरमार्गे माळशेजला जातात. वाहनाऐवजी पायी घाट चढत असताना पर्यटकांना आपल्या आवडीनुसार छोट्या-मोठ्या धबधब्यांचा मनसोक्त आनंद लुटता येते. त्यामुळेच तरुण पर्यटक हे बाईकने जाणे पसंद करतात. माळशेज घाटानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सिद्धगड हे एक निसर्गाने नटलेले इतिहासकालीन ठिकाण आहे. सिद्धगडावरील धबधबे आणि पर्यटकांना आकर्षित करणारा सुभेदार धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात ट्रेकर्स तसेच पर्यावरण प्रेमींचे सिद्धगड हे प्रसिद्ध असे ठिकाण आहे.

खास सेल्फी पॉईंट सज्ज

भूक लागली तरी लगेच आवडीचे खाद्यपदार्थही जागोजागी उपलब्ध असतात. पर्यटकांची वाढती संख्या पाहता ठाणे जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग आणि वन विभागाकडून पर्यटकांना आनंद लुटता यावा यासाठी खास पॉईंटही विकसित केले आहेत. कपडे बदलण्यासाठी आणि वाहन पार्किंगसाठी व्यवस्था केली आहे. पर्यटकांना निसर्गासोबत छायाचित्र टिपता यावे, याकरिता खास सेल्फी पॉईंटही सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्यामुळेच हजारो पर्यटक शनिवार-रविवारी या धबधब्याच्या स्वर्गाचा आनंद लुटण्यासाठी माळशेज घाटाला पसंती देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT