पुढारी ऑनलाईन डेस्क : मालदीवच्या मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर भारतात सोशल मीडियावर BoycottMaldives ट्रेंड सुरू (India Bycott On Maldieves Tourism) झाला आहे. हजारो भारतीयांनी मालदीमध्ये केलेले बुकिंग कॅन्सल केले आहे. परिणामी मालदीवच्या पर्यटन क्षेत्राला तसेच विमान कंपन्यांना याचा तोटा सहन करावा लागतोय. दरम्यान, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांनी भारतीय पर्यटकांचा धसका घेतला असून चीनकडे मदतीची याचना केली आहे. चीनने मालदीवमध्ये पर्यटक पाठवावेत असे आवाहन त्यांनी केले आहे. मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे आणि त्यामध्ये सर्वाधिक वाटा हा भारतीय पर्यटकांचा आहे.
भारत-मालदीव वादाच्या पार्श्वभूमीवर मालदीवचे राष्ट्रपतींनी सोमवारी रात्री चीन गाठले. तिथे मंगळवारी दक्षिण चिनी बंदर शहरातील 'इन्व्हेस्ट मालदीव' कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांनी स्थानिक चीनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, पायाभूत सुविधांपासून पर्यटनापर्यंतच्या करारांवर दोन्ही देशांदरम्यान स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.
फुझियान प्रांतातील मालदीव बिझनेस फोरममध्ये दिलेल्या भाषणात राष्ट्रपती मुइझ्झू म्हणाले की, चीन हा मालदीवचा सर्वात 'जवळचा' मित्र आणि विकासाचा भागीदार आहे.' यादरम्यान, मुइझ्झू यांनी 2014 मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सुरू केलेल्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) प्रकल्पांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, शी जिनपिंग यांनी मालदीवच्या इतिहासात सर्वात महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्प वितरित केले. आता चीनने मालदीवमध्ये पर्यटकांचा ओघ वाढवावा,' असे आवाहन यावेळी केले.
2 जानेवारीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपला पोहोचले होते. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले, त्यामध्ये ते समुद्रकिनारी फिरताना दिसत आहे. ही छायाचित्रे आणि व्हिडीओ शेअर करताना पंतप्रधानांनी लक्षद्वीपला भेट देण्याचे भारतीय पर्यटकांना आवाहन केले.
त्यांच्या या आवाहनानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि लक्षद्वीपवर वक्तव्य करायला सुरूवात केली. त्यानंतर भारतातील जनतेने आक्षेप घेत मालदीववर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू केल्यावर मालदीवच्या सरकारने टीका करणाऱ्या तीन मंत्र्यांचे राजीनामे घेतले. अशातच भारतीय पर्यटकांनी एकजुटीने मालदीवर बहिष्कार टाकून त्यांची कोंडी केली आहे.