कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणार्या मेकर ग्रुप ऑफ इंडिया कंपनीचे प्रमुख रमेश महादेव वळसे-पाटील ( वय 60), छाया रमेश वळसे-पाटील (54, रा. आकुर्डी, जि. पुणे) या दाम्पत्याला आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी पहाटे जेरबंद केले. न्यायालयाने दोघांना अनुक्रमे सहा व तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच संशयित पसार झाले होते. पथकाने दाम्पत्यांना रविवारी रात्री उशिरा पुण्यातून अटक केली. वळसे-पाटील यांच्या मालकीची दोन कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.
मेकर ग्रुप ऑफ इंडिया कंपनीचे पदाधिकारी, संचालकांनी 2010- 2018 या काळात कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकातील गुंतवणूकदारांची 56 कोटी 52 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे. मुदतीनंतरही परताव्याची रक्कम न मिळाल्याने गुंतवणूकदारांचा तगादा वाढला होता. संचालकांनी फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये संशयितांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित वळसे-पाटील दाम्पत्य कंपनीचे प्रमुख होते. दोघांना पुण्यातून अटक करण्यात आल्याचे कळमकर यांनी सांगितले.
दाम्पत्याच्या मालकीची दोन कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्यांची बँक खातीही गोठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे तपासाधिकार्यांनी सांगितले.