बाळासाहेब गदादे
चिचोंडी पाटील : शासनाने लाखो रुपये खर्च करून नगर तालुक्यातील मेहेकरी नदीवर बांधलेल्या बंधार्यांना गळती लागली असून, हे सर्व बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे बंधारे बांधण्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे. जिल्ह्यातील दक्षिण भाग दुष्काळी. त्यामुळे या परिसरातील शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे या भागात शासनाने 'पाणी अडवा पाणी जिरवा' या योजनेअंतर्गत दुष्काळी भागात विविध उपाययोजना राबविल्या. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील, आठवड व भातोडीच्या हद्दीत मेहेकरी नदीवर अनेक बंधारे बांधले आहेत.
मात्र, यातील भातोडी, आठवड व चिचोंडी पाटीलच्या हद्दीतील अनेक बंधार्यांना गळती लागून ते कोरडे पडले आहेत. त्यामुळे नदीला पाणी आले तरीही या बंधार्यात पाणी साठवले जात नाही. पर्यायाने नदीचे पाणी आटताच सर्व बंधारे कोरडेठाक होण्यास सुरुवात होते. त्यामुळे बंधारे बांधून पाणी साठवल्याने परिसरातील शेती ओलिताखाली येवून शेतकरी संपन्न होण्याच्या धोरणाला हारताळ फासला जात आहे. यामुळे या बंधार्यांच्या कामावर शासनाने केलेले कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
भूगर्भातील जलस्तर वाढावा, उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे जेणेकरून शेतकर्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषदेकडून मोठा खर्च करून बंधारे बांधले जातात. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील, आठवड व भातोडीच्या परिसरातही असे अनेक बंधारे मेहेकरी नदीवर बांधण्यात आले आहेत.
परंतु, हे बंधारे बांधताना शासनाने ठरवून दिलेल्या मापदंडाचा वापर न करता अधिकार्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे व ठेकेदाराच्या सोईनुसार काम केले. परिणामी परिसरातील अनेक बंधार्यांना गळती लागून कोरडे पडलेे. त्यामुळे पावसाळ्यात नदीला पाणी असता या बंधार्यात पाणी असते; मात्र जसजसी नदी कोरडी पडते तसे या बंधार्यात पाण्यात थेंब देखील राहत नाही. त्यामुळे शासनाचा कोट्यवधीचा निधी वाया गेला आहे.