पुणे, पुढारी वृत्तसेवा: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र शेतकर्यांची पुणे जिल्ह्यातील पहिल्या टप्प्याची यादी शुक्रवारी (दि.14) जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील 58 हजार 44 कर्जखातेदार शेतकर्यांचा समावेश असून, अन्य यादीही पुढील आठवड्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे दिवाळी सणापूर्वी शेतकर्यांना प्रोत्साहनपर लाभाची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात आले.
आर्थिक वर्ष 2017 ते 2020 या कालावधीत पीक कर्जाची नियमित परतफेड करणार्या शेतकर्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. पात्र शेतकर्यांची यादी टप्प्या-टप्प्याने घोषित केली जाणे अपेक्षित असून, पहिल्या टप्प्यातील यादी जाहीर झालेली आहे. ही यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सूचनाफलकावर शेतकर्यांना पाहता येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) मिलिंद सोबले यांनी दिली. या यादीतील शेतकर्यांनी आपले आधार कार्ड, कर्जखाते पासबुक व बचतखाते पासबुक घेऊन नजीकच्या 'आपले सरकार सेवा केंद्र' किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणिकरण करून घेणे अनिवार्य आहे. शेतकरी आधार प्रमाणिकरणासाठी गेल्यावर संबंधित संगणकावर दिसत असलेल्या कर्जखात्यांचा तपशील, आधार क्रमांक इत्यादी बाबींची खातरजमा केली जाणार आहे.
आधार प्रमाणिकरणानंतर संबंधित शेतकर्यांच्या बँकेच्या बचत खात्यामध्ये थेट प्रोत्साहनपर लाभाची रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही तत्काळ केली जाईल. त्यामध्ये सन 2017-18, 2018- 19 व 2019-20 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जाची उचल करून देण्यात आलेल्या कालावधीत त्याची परतफेड केलेली असणे आवश्यक आहे. अशा शेतकर्यांना राज्य सरकारडून 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचेही सोबले यांनी सांगितले.
प्रोत्साहनपर लाभाच्या घोषित पहिल्या टप्प्यातील यादीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पीडीसीसी) 54 हजार 671 शेतकरी आहेत. बँकनिहाय शेतकरी संख्या पुढीलप्रमाणे- बँक ऑफ बडोदा 390, बँक ऑफ इंडिया 198, बँक ऑफ महाराष्ट्र 1954, कॅनरा बँक 25, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 98, आयसीआयसीआय 2, आयडीबीआय 24, इंडियन बँक 8, महाराष्ट्र ग्रामीण बँक 18, पंजाब नॅशनल बँक 9, स्टेट बँक ऑफ इंडिया 236, युको बँक 159, युनियन बँक ऑफ इंडिया 251, विदर्भ कोकण बँक 1 मिळून एकूण 58 हजार 44 शेतकर्यांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रोत्साहनपर लाभ योजनेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पीडीसीसी) प्रथम टप्प्यातील तालुकानिहाय कर्ज खात्यांची संख्या 54 हजार 671 असून त्यापैकी पहिल्याच दिवशी 22 हजार 534 कर्जखात्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. तर 32 हजार 137 कर्जखात्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी असून, त्यांनीही तत्काळ ते पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केले आहे. पहिल्या टप्प्यात तालुकानिहाय कर्जखात्यांची संख्या पुढीलप्रमाणे- आंबेगाव 8935, बारामती 3110, भोर 2024, दौंड 2002, हवेली 1105, इंदापूर 3133, जुन्नर 13135, खेड 10040, मावळ 1536, मुळशी 977, पुरंदर 2628, शिरुर 5562, वेल्हा 484 कर्जखात्यांचा समावेश आहे.