महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाई होय. करवीर निवासिनीच्या सभोवताली असणाऱ्या विविध देव- देवतांमुळे या नगरीला एक वेगळी आध्यात्मिक बैठक प्राप्त झाली आहे. एकवीरा, मुक्तांबिका, पद्मावती, प्रियंगाई, कमलजा, महाकाली, अनुगामिनी, गजेंद्रलक्ष्मी, श्री लक्ष्मी आदी नवदुर्गांबरोबर त्र्यंबोली, उज्ज्वलांबा, कात्यायनी या तीन वरप्राप्त देवताही तितक्याच महत्त्वपूर्ण मानल्या जातात. देवांच्या रक्षणासाठी व दुष्ट राक्षसांचा संहार करण्यासाठी वेळोवेळी स्त्रीशक्तीने अवतार घेतले. या अवतारांमध्ये नवदुर्गांना विशेष महत्त्व आहे. विविध धार्मिक ग्रंथांत या नवदुर्गांचे उल्लेख आहेत. नवरात्रौत्सवानिमित्त या नवदुर्गांची माहिती जाणून घेऊया.
रविवार पेठेतील आझाद चौकात दत्त भिक्षालिंग स्थानाजवळ (कॉमर्स कॉलेज) नवदुर्गांतील प्रथम दुर्गा श्री एकवीरा तथा श्री एकांबिका देवीचे मंदिर आहे. शक्तिप्रधान, श्रीदुर्गेचे पालक स्वरूप, सर्वेच्छा पूर्ण करणारी व सर्व शक्तिगणातील प्रधान देवता असे श्री एकवीरा तथा श्री एकांबिका देवीला महत्त्व आहे. मार्कंडेय पुराणात 'एकांकिका' ही शक्तिप्रधान देवता आहे. या दुर्गेचे स्वरूप पालकत्त्वाचे आहे. मनोरथ पूर्ण करणारी, शक्ती गणांतील ही देवता प्रधान देवता म्हणून सुप्रसिद्ध आहे. `रेणुका, यल्लमा, रामजननी' अशा विविध नावांनी ही देवता लोकाभिमुख आहे. जमदग्नी ऋषींची पत्नी व भगवान परशुरामांची माता, महाशक्तिपीठांतील माहूरगडची देवता म्हणूनही देशभर प्रसिद्ध आहे.
देवीच्या मुखवट्याची पूजा होते. अनेकांची कूळदेवता असून ती निर्गुण रूपात आढळते. या देवतेला यमाई देवी म्हणूनही संबोधतात. अगस्त्य ऋषी आणि लोपामुद्रा यांनी या मंदिराला भेट दिल्याचे प्राचीन संदर्भ आढळतात. स्वयंभू अशी ही तांदळा (शिळा) असून एक हात उंचीची असून त्यावर रौप्य धातू मुखवटा बसवला आहे. भैरव आणि जोतिबा या परिवार देवता म्हणून ओळखल्या जातात. या मंदिरात वेताच्या बुट्ट्या (परडी) मध्ये देवीच्या मुखवट्याची पूजा होते. मिठा-पिठाचा जोगवा घालण्याची प्रथा अनेकांची कुळदेवता असून ती निर्गुण आहे.