Shweta Singh DGCA Controversy: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात रोहित पवारांनी खळबळजनक खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात मोठे गौप्यस्फोट केले आहेत. त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या निष्पक्षतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रोहित पवार यांनी या अपघातासाठी जबाबदार असलेल्या कंपनी VSR Aviation ला वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची भीती व्यक्त केली आहे.
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, बारामती विमान अपघाताची चौकशी ज्या पद्धतीने सुरू आहे ती समाधानकारक नाही. त्यांनी आरोप केला की तपास योग्य दिशेने पुढे जाऊ दिला जात नाही. तसेच त्यांनी श्वेता सिंग यांचे नाव घेत मोठा आरोप केला आहे.
श्वेता सिंग डीजीसीए मधून मोठं रॅकेट चालवत आहेत. श्वेता सिंग यांना डीजीसीएमध्ये ठेवू नका अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे. विमान नीट आहे की नाही हे तपासलं जात नाही. विमानाची माहिती नसलेले लोक चौकशी समितीमध्ये आहेत, असाही आरोप रोहित पवारांनी केला आहे.
रोहित पवार म्हणाले, श्वेता सिंग या आपल्या महाराष्ट्राच्या सुनबाई होत्या आता नाहीयेत. त्या डीजीसीएमध्ये काम करतात. फार मोठ्या फॅमिलीमध्ये त्यांचं लग्न झालं होतं आणि आज जो पक्ष सत्तेत आहे त्याच्याशी निगडित असणारं हे कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये फार भावनिक गोष्ट झाली ती कधीच आपण विसरु शकत नाही. याचा अंदाज तुम्हाला आहेच. आज त्या डीजीसीएममध्ये बसून त्यांच्या कॉन्टॅक्टचा वापर करून त्या एक रॅकेट चालवतात.
वैमानिक आणि विमानसुरक्षा तज्ज्ञ कॅप्टन श्वेता सिंह या Directorate General of Civil Aviation (DGCA) मध्ये Chief Flight Operations Inspector (CFOI) म्हणून काम करतात. विशेष म्हणजे, या पदावर पोहोचणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला पायलट आहेत.
कॅप्टन श्वेता सिंह यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात जेट एअरवेजमध्ये कमर्शियल पायलट म्हणून केली. त्यानंतर त्यांनी DGCA मध्ये कामाला सुरुवात केली.
गेल्या अनेक वर्षांत त्यांनी फ्लाइट ऑपरेशन्स, विमानसुरक्षा, जोखीम व्यवस्थापन, तसेच अपघात व घटना तपासणी या क्षेत्रांत काम केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील Federal Aviation Administration (FAA) आणि International Civil Aviation Organization (ICAO) यांच्या ऑडिट प्रक्रियेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
DGCA मध्ये Deputy Chief Flight Operations Inspector म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक सर्व्हेलन्स आणि सेफ्टी ऑडिट्सचे नेतृत्व केले. USOAP ऑडिट्स, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तपासणी आणि विमानांची सुधारणा या सगळ्यांमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
DGCA मध्ये त्यांनी फ्लाइट सेफ्टी आणि रिस्क मॅनेजमेंटसारख्या विभागांमध्येही काम केले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचा विवाह अभिनेता राहुल महाजन यांच्याशी झाला होता, मात्र नंतर दोघांचा घटस्फोट झाला. राहुल महाजन हे भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे चिरंजीव आहेत.