पंढरपूर : कार्तिक शुध्द प्रबोधनी एकादशी दिवशी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा संपन्न होत असते. कार्तिकी एकादशी मंगळवार १२ नोव्हेंबर आहे. या दिवशी पहाटे २.२० वाजता श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी माता, या देवतांची राज्याचे उपमुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा आयोजित करण्यात येते.
पण यावर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ ची अधिसूचना प्रसिध्द झालेली आहे. आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाने केलेल्या मार्गदर्शनानुसार या वर्षीची श्री विठ्ठल व श्री रूक्मिणीमातेची शासकीय महापूजा शासनाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.), विभागीय आयुक्त, पुणे व मानाचे वारकरी यांचे हस्ते सपत्नीक करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
याशिवाय, शासकीय महापूजेपूर्वी मंदिर समिती मार्फत होणारी श्रीं विठ्ठल व श्री रूक्मिणीमातेची पाद्यपुजा व नित्यपुजा अनुक्रमे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते संपन्न होत असून, शासकीय महापूजेसाठी कर्तव्यावरील प्रशासकीय अधिकारी व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित राहणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.