विदर्भ

यवतमाळ : स्वागत समारंभातून चोरट्याने सहा लाख उडविले

रणजित गायकवाड

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : चापमनवाडी येथील तरुणाच्या लग्नाचा स्वागत समारोह स्टेट बँक चौकातील शिवशक्ती लॉन येथे शुक्रवारी रात्री पार पडला. या लग्नात शिरलेल्या चोरट्याने तब्बल पाच लाख ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

तेजस राजेंद्र तिवारी याचा विवाह सोहळा ३ मे रोजी जालना येथे पार पडला. त्याने शुक्रवारी शिवशक्ती लॉनमध्ये स्वागत समारोह ठेवला. शुभेच्छा देण्यासाठी नातेवाइकांसह मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. नवदाम्पत्याला भेट स्वरूपात रोख पैसे, दागिने व इतर मौल्यवान वस्तू दिल्या गेल्या. या वस्तू एका हॅन्डबॅगमध्ये नवरदेवाजवळ ठेवण्यात आल्या होत्या. ही बॅग स्टेजवरच नवरदेवाच्या बाजूला ठेवलेली होती. गर्दीचा फायदा घेत रात्री १० वाजताच्या सुमारास एक अनोळखी २० वर्षीय युवक तेथे पोहोचला. त्याने ती बॅग उचलून पोबारा केला.

त्या बॅगमध्ये दीड लाखांची रोख व उर्वरित रकमेचे दागिने असा पाच लाख ९३ हजारांचा मुद्देमाल होता. चोरट्याने हा मुद्देमाल लंपास केला. चोरीच्या घटनेनंतर फोटो तपासण्यात आले. त्यात एक संशयित अनोळखी गवसला. बॅग चोरी केल्याची तक्रार आकाश तिवारी याने शनिवारी शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

SCROLL FOR NEXT