विदर्भ

मेहबूबांनी ‘व्हिक्टीम कार्ड’ खेळणे बंद करावे : पुनीत इस्सर

backup backup

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : काश्मिरात पाकिस्तानच्या चिथावणीवर स्थानिक मुस्लिमांनी हिंदुंचा नरसंहार केला हे सत्य आहे. त्यामुळे अन्याय झाला म्हणून तेथील तरुणांनी शस्त्र हाती घेतल्याचे सांगत व्हिक्टीम कार्ड खेळणे मेहबूबा मुफ्तींनी बंद करावे आणि चित्रपटात दाखवलेला हिंदूंचा नरसंहार खरा आहे कि नाही याबाबत बोलावे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते पुनीत इस्सर यांनी बुधवारी नागपुरात केले.

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द काश्मीर फाइल्स' या बॉलिवूड चित्रपटाद्वारे भाजपवर निशाणा साधताना म्हटले होते की, चित्रपटाच्या माध्यमातून भाजपने द्वेषाचे राजकारण सुरू केले आहे. या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणारे पुनीत इस्सर म्हणाले की, 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे.

काश्मिरी हिंदूंचा नरसंहार आणि पलायन हे स्वतंत्र भारताचे कटू वास्तव आहे. ही कधीही न विझणारी आग आहे. आजवर काश्मीरच्या पार्श्वभूमीवर बनवलेले 'हैदर' आणि 'मिशन काश्मीर' सारखे चित्रपट खोटा नॅरेटिव्ह सेट करतात. अन्यायाच्या विरोधात खोऱ्यातील मुस्लिमांनी शस्त्रे उचलली असे भासवले जाते. परंतु, हे सत्य नसल्याचे इस्सर यांनी सांगितले.

स्वतःच्या कुटुंबाचे उदाहरण देताना पुनीत इस्सर म्हणाले की, देशाच्या फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब पाकिस्तानातून भारतात आले होते. त्यावेळी त्यांच्यासह लाखो हिंदू कुटुंबांचे सर्वस्व लुटले गेले. पण आम्ही कधीच शस्त्र उचलले नाही. अन्याय झाला म्हणून शस्त्र उचलले असे सांगणे म्हणजे दहशतवादाचे समर्थन करणे आहे.

महबूबा मुफ्ती यांनी खोऱ्यातील हिंदुंच्या नरसंहारावर बोलावे असे पुनीत इस्सर म्हणाले. जर्मनीतील नाझी लोकांनी ज्यू लोकांची कत्तल केली होती. परंतु, जर्मनीतील इतर लोक हिटलर किंवा नाझी विचारांचे समर्थन करीत नाहीत. त्याचप्रमाणे भारतीय मुस्लीमांनी काश्मिरातील दहशतवादाच्या विरोधात बोलणे आवश्यक आहे. भारतीय मुस्लीम चांगले आहेत फक्त त्यांनी वाईटाच्या विरोधात आवाज बुलंद केला पाहिजे असे इस्सर यांनी सांगितले.

पुनीत इस्सर : पंतप्रधानांवर टीका अयोग्य

पंतप्रधानांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाला सत्यापासून प्रेरित म्हटले होते. त्यामुळे विरोधी पक्ष पंतप्रधान आणि भाजपवर चित्रपटाचा प्रचार केल्याचा आरोप करतात. याबाबत पुनीत म्हणाले की, पंतप्रधानांच्या जीवनावर बायोपिक बनवण्यात आला होता. पण तो चित्रपट व्यावसायिक दृष्टीने यशस्वी मानला जात नाही. पंतप्रधानांना चित्रपटाचे प्रमोशन करायचे असते तर त्यांनी स्वत:च्या जीवनावर बनलेल्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर पडू दिले नसते. पंतप्रधानांनी चित्रपटात दाखवलेले सत्य मान्य केले असेल तर त्यांच्यावर चित्रपटाच्या प्रमोशनचा आरोप करणे अयोग्य असल्याचे इस्सर यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT