नागपूर; पुढारी वृत्तसेवा : एका हॉटेल व्यावसायिकाला धमकावून लाखो रुपये उकळल्या प्रकरणी अटकेत असलेला कुख्यात गुंड हारिस आरीफ रंगुनवाला (वय ३५, रा. जाफरनगर) याच्या विरोधात पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण एका व्यावसायिकाच्या तक्रारीवरून नोंदविण्यात आले आहे. भागीदारीत व्यवसाय करण्याच्या बहाण्याने हारिसने सय्यद अजहर अली (वय ६१) यांना जाळ्यात ओढले व त्यांच्याकडून पैसे उकळले. मुलाचे अपहरण करूनही त्याने अजहर यांच्याकडून ५.५० लाख रुपये उकळले. अली यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
अजहर एसी दुरुस्तीचे काम करीत होते. सोबत काम करणाऱ्या दोन तरुणांच्या माध्यमातून २०१९ मध्ये अजहर यांची ओळख हारिस याच्याशी झाली. हारिसने सांगितले की, आपले नालसाहेब चौकात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान आहे. त्याच्या दुकानातून माल खरेदी करत स्वत: दुकान सुरू करण्यासाठी छावनीच्या बर्गरसिंग नावाच्या रेस्टॉरेंटजवळ एक जागा दाखवली. अजहर यांनी लाखो रुपये खर्च करून दुकानासाठी टिनाचे शेड तयार केले. हारिसला रोख रक्कम देऊन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली. काही वस्तू इतर व्यापाऱ्यांकडून खरेदी केल्या. दर महिन्याला हारिसला २६ हजार रुपये भाडेही दिले.
एप्रिल 2021 मध्ये हारिसने अजहरचे कुलूप तोडून स्वत:चे कुलूप लावत दुकानावर अवैधरित्या ताबा केला. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे 6.90 लाख रुपये दिल्यानंतरच दुकानातील सामान देईल असे सांगितले. अजहरकडून बळजबरीने काही धनादेशही घेतले. त्यानंतरही हारिस त्यांना त्रास देत होता. 12 नोव्हेंबर 2021 ला हारिस त्यांच्या घरी आला. 8 वर्षांचा मुलगा युसूफ याला सोबत घेऊन गेला. मुलाला जिवे मारण्याची धमकी देऊन 5.50 लाख रुपयांची खंडणी मागितली. मुलाचा जीव वाचविण्यासाठी अजहर यांनी हारिसला पैसे दिले आणि मुलाची सुटका करून घेतली. मात्र हारिसने त्यांना त्रास देणे सोडले नाही. एकूण 11.50 लाख रुपये घेतल्यानंतरही हारिसने अजहर यांना दुकानाचे सामान परत केले नाही. त्याचे गुन्हेगारांशी संबंध आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भीतीने अजहर यांनी तक्रार केली नाही. सदर ठाण्यात हारिस आणि त्याचा भाऊ जैन याच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाल्यानंतर अजहर यांनी हिंमत करून पोलिसात तक्रार केली. हारिस विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.विशेष म्हणजे तो आधीच एका प्रकरणात पोलिस कोठडीमध्ये आहे.