विदर्भ

पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षाविरूद्ध पोलिसांत तक्रार

अमृता चौगुले

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल नागपूर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांच्या विरूद्ध भाजपने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शेख हुसेन यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल अत्यंत निंदाजनक आणि खालच्यास्तराचे वक्तव्य केल्याचे भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. मंगळवारी सायंकाळी पर्यंत हुसेन यांच्याबद्दल गुन्हा दाखल केला नाही, तर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करू वा प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.

नागपूर भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके आणि प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात मंगळवारी ही तक्रार दाखल केली आहे. नवी दिल्ली नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी), हंगामी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवार १३ जून रोजी नागपुरातील ईडी कार्यालयासमोर विदर्भातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी धरणे देऊन केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. या कार्यक्रमात बोलताना शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले.

हुसेन यांना कोणी थांबवले नाही

विशेष म्हणजे शेख हुसेन बोलत असताना व्यासपीठावर उर्जा मंत्री नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंत पुरके, राजेंद्र मुळक, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, आमदार अॅड. अभिजित वंजारी आदी नेते उपस्थित होते. मात्र, एकानेही हुसेन यांना बोलण्यापासून रोखले नाही. शेख हुसेन यांचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. हुसेन यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे वातावरण गढूळ झाले आहे. यास्तव त्यांच्या विरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दटके यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT