विदर्भ

नागपूर : पब्‍लिक टॉयलेटसाठी महिलांचा एल्‍गार; नागपूर सिटिझन्स फोरमचे आंदोलन

निलेश पोतदार

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा लोकसंख्येच्या तुलनेत नागपूर-शहरात प्रसाधनगृहांची संख्या, सार्वजनीक मुतार्‍यांची दयनीय स्थिती, पब्लिक टॉयलेटअभावी महिलांच्या आरोग्याचा निर्माण झालेला प्रश्न व सरकारी कार्यालयातील अस्वच्छ वॉशरुम्स या मुद्यावर नागपुरातील महिलांनी एल्गार पुकारला आहे. नागपूर सिटिझन्स फोरमच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकात आज (रविवार) हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

शहरातील महिला, सामाजिक कार्यकर्त्या, महाविद्यालयीन युवती, नोकरदार महिला व विविध बाजारपेठांमध्ये काम करणार्‍या महिला प्रातिनिधीक स्वरुपात या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. स्वच्छ व सुरक्षित प्रसाधनगृहांची मागणी करणारे फलक हाती घेत आंदोलनकर्त्या महिलांनी नागपूर महानगरपालिका व जनप्रतिनिधीं विरोधात घोषणा देत रोष प्रकट केला. गेल्या वर्षभरापासून नागपूर सिटिझन्स फोरमने "राईट टू पी" हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत जनजागृती, पब्लिक टॉयलेटची तपासणी व जनमत संग्रह असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले.

महाविद्यालयीन विद्यार्थीनी, नोकरदार महिला, ऑटो रिक्षा चालक व फुटपाथ दुकानदारांनी या उपक्रमांमध्ये भाग घेत मनपा प्रशासनाकडे स्वच्छ व मुबलक स्वच्छता गृहांची मागणी केली. स्वच्छता गृहांच्या सद्यस्थितीची माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण शहरात सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात जे वास्तव पुढे आले त्याची माहिती मनपा प्रशासनाला विविध माध्यमातून देण्यात आली. वर्ष लोटले तरी महानगरपालिका या संदर्भात कुठलेही सकारात्मक काम करतांना दिसत नाही त्यामुळे सिटिझन्स फोरमने महिला दिनाचे औचित्य साधत पालिकेविरोधात लक्षवेधी आंदोलन केले.

लोकसंख्येच्या तुलनेत प्रत्येक वस्तीत व मार्केट एरियामध्ये प्रसाधन गृहांची निर्मिती, महिलांसाठी स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुरक्षित वॉशरुमची निर्मिती व सरकारी कार्यालयांमधील प्रसाधनगृहांच्या स्थितीत सुधारणा करा अशा तीन प्रमुख मागण्या फोरमच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

या आंदोलनात योगिता शेंडे, जयश्री गाडगे, रेणूका लांडे, पूजा जांगडे, मीना कुंभारे, अमृता अदावडे,अपूर्वा पित्तलवार, शिप्रा विंचूरकर, आरती नान्हे, प्रियंका कारेमोरे, वैष्णवी गिरी, मनिषा राजवाडे, रजत पडोळे, वैभव शिंदे पाटील, अभिजीत झा, अभिजीत सिंह चंदेल, अमित बांदूरकर, गौरव ठाकरे, प्रतिक बैरागी, शिवम उमरेडकर, प्रज्वल गोड्डे आदी सहभागी झाले.

हजारो कोटींच्या योजना मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष का? 

या शहरात मेट्रोचा विस्तार होत आहे, उड्डाण पूल बनताहेत, सिमेंटचे रस्ते होत आहेत. करोडो रुपये खर्च करुन म्युजिकल फाउंटेनचा देखावा उभा केला गेला. पण आमची महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी चांगले युरिनल्स व प्रसाधन गृह उपलब्ध करून देऊ शकत नसल्याचे मत सिटिझन्स फोरमचे समन्वयक रजत पडोळे यांनी व्यक्त केले. प्रसाधन गृहांची निर्मिती हे महानगरपालिकेचे काम आहे, मात्र हजारो कोटी रुपयांचे बजेट असूनही मनपा सीएसआर फंड आणि एनजीओकडे हात पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या 10 दिवसात महानगरपालिकेने यासंदर्भात काही ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर जी-20 देशांच्या सिव्हील सोसायटीपुढे नागपुरातील अस्वच्छ व दयनीय स्थितीतील प्रसाधन गृहांचे प्रदर्शन मांडण्याचा इशारा नागपूर सिटिझन्स फोरमने दिला आहे.

11 वर्षात मनपाला हे करता येऊ शकले नाही – ॲड स्मिता सिंघलकर 

दरम्यान, महिलांच्या प्रश्नावर कायदेशीर लढा देणार्‍या ॲड. स्मिता सिंघलकर या आंदोलनात सहभागी झाल्या. सिंघलकर यांनी शहरातील पब्लिक टॉयलेट्सविषयी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. 11 वर्ष लोटली तरी महानगरपालिका या संदर्भात काही ठोस करायला तयार नसल्याचा आरोप सिंघलकर यांनी केला आहे. महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील प्रसाधनगृहे अस्वच्छ, असुरक्षित व आरोग्यासाठी घातक आहेत. महिलांसाठी सार्वजनिक प्रसाधन गृहांची सोय नसणे ही शहराच्या दृष्टीने लाजीरवाणी बाब असल्याचे त्या म्हणाल्या. येत्या काळात महिलांचे मोठे आंदोलन उभारुन महानगरपालिकेला पब्लिक टॉयलेट्सची सोय करण्यास बाध्य करु असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT