गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : गडचिरोली शहरात चार जणांनी आपसात संगनमत करुन भिशीच्या नावे रक्कम जमा करणाऱ्यास दीड टक्के दराने कमिशन मिळेल, तसेच कमिशन घेतले नाही, तर भिशीच्या मुदतीपूर्तीनंतर मोठ्या रकमेचा परतावा देण्यात येईल, असे आमिष दाखवले. याला बळी पडून शहरातील काही नागरिकांनी सोनू जमशेद ठाकूर याच्याकडे भिशीची रक्कम जमा केली. यातील एका व्यक्तीच्या भिशीची मुदत पूर्ण होऊनही ३० लाख रुपये व त्यावरील कमिशन मिळाले नाही. त्यामुळे त्याने पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू जमशेद ठाकूर, इकरार जमशेद ठाकूर, करिश्मा सोनू ठाकूर व छगन शरद जेंगठे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोंपीविरुद्ध तक्रार असलेल्या नागरिकांनी उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन गडचिरोली पोलिसांनी केले आहे.
भिशीमध्ये शहरातील अनेक डॉक्टरांनी मोठी रक्कम गुंतवली आहे. काही कंत्राटदार आणि व्यावसायिकही या भिशीत सहभागी आहेत. या सर्वांनी गुंतवलेली रक्कम लाखोंच्या घरात आहे. काही डॉक्टरांचे ३० लाख, ४५ लाख रुपये भिशीत आहेत. भिशीवाल्याने पोबारा केल्यानंतर या सर्वांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा