यवतमाळ : कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मारेगाव तालुक्यातील कुंभा महसूल मंडळात येत असलेल्या नरसाळा येथे रविवारी (दि.१८) ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बेबीबाई तुळशीराम राजगडकर (वय ६५) या रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास गावातील सरकारी गिट्टी खदान परिसरातील पाण्याच्या खड्ड्यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. बराच वेळ होऊनही त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पाय घसरून त्या पाण्यात पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. शोध घेत असताना त्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांना तत्काळ बाहेर काढून मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मृत महिलेच्या पश्चात पती, दोन मुलं, सुना व नातवंड असा परिवार आहे.