Wani Truck Collision husband wife Deaths
यवतमाळ : कोळसा भरून निघालेल्या ट्रकच्या धडकेत पती-पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी रात्री वणी तालुक्यातील कोलगावजवळ घडली. या दुर्दैवी घटनेत मृत दाम्पत्याच्या तीन मुलांवर पोरकं होण्याची वेळ आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहेत.
बंडू बालाजी जिल्हेवार (वय ५८) आणि सुशीला बंडू जिल्हेवार (वय ५१) अशी मृतांची नावे आहेत. हे दाम्पत्य कोलगाव साखरा येथे वास्तव्याला होते. रविवारी काम बंद असल्याने दोघेही पती-पत्नी विवाहित मुलीला भेटण्यासाठी आवाळपूर येथे गेले होते. परत येताना सायंकाळी मुंगोली खाणीतून कोळसा भरून येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली.
या अपघातात दोघेही दुचाकीसह ट्रकखाली चिरडल्या गेले. वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी सहा तास वाहतूक रोखून धरली. मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, अशी भूमिका घेतली.
दरम्यान, आमदार संजय देरकर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांना वेकोली प्रशासनाकडून मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर रात्री दीड वाजता मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.