यवतमाळ : शेतात मोटर पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या एका ३८ वर्षीय सालगड्याचा विजेचा जबर धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना आज, रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील चातारी गावाजवळील 'धार चातारी' शेतशिवारात घडली. दिनेश शंकर माने (वय ३८, रा. चातारी) असे मृत सालगड्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश माने हे धार चातारी शिवारातील आशिष माने यांच्या शेतात सालगडी म्हणून कार्यरत होते. रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ते शेतातील पाण्याच्या पंपाची मोटर सुरू (किंवा बंद) करण्यासाठी गेले होते. मात्र, स्टार्टरच्या पेटीला हात लावताच अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हा प्रकार घडल्यानंतर शेजारील शेतकऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली. उंचवडद येथील रहिवासी सतीश कदम यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पीएसआय सुदर्शन वानोळे व पोलीस शिपाई हनुमंत मुसळे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्राथमिक तपास केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार नरेंद्र पुंड करत आहेत.