Fraud Case 
यवतमाळ

Yavatmal Gold Fraud : बनावट सोन्याचे देवशिक्के तारण ठेवून सोनाराला १३ लाखांचा गंडा

उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पुढारी वृत्तसेवा

उमरखेड : उमरखेड शहरातील सोनार लाईन परिसरात बनावट सोन्याचे देवशिक्के खरे असल्याचे भासवून ते तारण ठेवत एका सोनाराची १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवा नावाचा एक व्यक्ती, एक महिला आणि अन्य एका व्यक्तीने संगनमताने ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भाजपा कार्यकर्ते कैलास नर उदावंत (वय ५५, रा. टिळक वार्ड, उमरखेड) यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९.३५ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या सुमारास शिवा नावाचा व्यक्ती आपल्या दोन साथीदारांसह उमरखेड येथील के.एन. ज्वेलर्स या दुकानात आला. त्यांनी आपल्याकडे सोन्याचे देवशिक्के असल्याचे सांगत पैशांची गरज असल्याचे उदावंत यांना सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून उदावंत यांनी देवशिक्क्यांची सखोल तपासणी न करता १३ तोळे वजनाचे ११ देवशिक्के तारण म्हणून स्वीकारले आणि त्याबदल्यात १३ लाख रुपये रोख दिले.

काही वेळानंतर तारण ठेवलेल्या देवशिक्क्यांबाबत उदावंत यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी बुलढाणा अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेतून देवशिक्क्यांची तपासणी करून घेतली. मशीनद्वारे तपासणी केली असता हे देवशिक्के सोन्याचे नसून बनावट असल्याचे उघड झाले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उदावंत यांनी संबंधित व्यक्तींनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. शिवा नावाच्या व्यक्तीसह एक महिला आणि अन्य एका व्यक्तीने बनावट देवशिक्के खरे असल्याचे भासवून ते तारण ठेवले आणि १३ लाख रुपये घेऊन पोबारा केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्यासह संबंधित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उदावंत यांनी पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT