उमरखेड तालुक्यातील मुळावा येथील शहाजी गंगाराम खडसे (वय ७६) आणि भागोराव गंगाराम खडसे (वय ८५) यांचा उपोषणाचा इशारा Pudhari
यवतमाळ

Umarkhed News | रेल्वे प्रकल्पासाठी मुरूम उत्खननाने शेतजमीन नापीक; उमरखेडच्या वृद्ध भावांचा नागपूर अधिवेशनात आमरण उपोषणाचा इशारा

करार करूनही अटींचे पालन नाही, रेल्वे प्रकल्पाच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा आरोप, जमीन व नुकसानभरपाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Nanded Railway Project Murum Excavation Umarkhed

उमरखेड (जि. यवतमाळ) : रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी मुरूम देण्याच्या नावाखाली कंत्राटदार कंपनीने शेतातील मुरमाचे बेकायदेशीर उत्खनन केल्याने दोन वयोवृद्ध शेतकरी भावांची जमीन नापीक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. उमरखेड तालुक्यातील मुळावा येथील शहाजी गंगाराम खडसे (वय ७६) आणि भागोराव गंगाराम खडसे (वय ८५) यांनी या प्रकरणी न्याय मिळावा, यासाठी येत्या ७ डिसेंबरपासून नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

करार करूनही अटींचे पालन केला नसल्याचा आरोप

खडसे बंधूंची हातला शिवारातील सर्व्हे क्रमांक ६५ मध्ये शेतजमीन आहे. ३० जानेवारी २०२५ रोजी 'पीएमपीएल-आरव्हीएससीपी (जेव्ही) पावरमेक प्रोजेक्ट लि.' या कंपनीच्या कंत्राटदाराने त्यांच्याशी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार केला होता. या करारानुसार शेतातील मुरूम नेण्याच्या मोबदल्यात काळी माती टाकून जमीन सपाट करून देणे, तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्याचे खोदकाम करणे अपेक्षित होते.

मात्र, जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगून कंपनीच्या प्रतिनिधींनी दोन्ही भावांच्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या आणि अंगठे घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर शेततळे खोदण्याची कोणतीही मागणी नसताना शेततळ्याच्या नावाखाली सुमारे एक एकर क्षेत्रातील मुरूम जबरदस्तीने खोदून नेण्यात आला, असे खडसे बंधूंचे म्हणणे आहे. या उत्खननामुळे शेतजमिनीचे नुकसान झाले असून, जमीन पडीत आणि नापीक झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यांसह तक्रार

या प्रकरणात संबंधित कंपनीचे अधिकारी तसेच यवतमाळचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांनी संगनमत करून आपली फसवणूक केल्याचा गंभीर आरोप खडसे बंधूंनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाकडे पुराव्यांसह तक्रार अर्ज पाठविले आहेत.

शेतातील नेलेल्या मुरमाच्या मोबदल्यात पर्यायी जमीन द्यावी किंवा झालेल्या नुकसानीची संपूर्ण भरपाई मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. तसेच हा प्रश्न हिवाळी अधिवेशनात उपस्थित करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास ७ डिसेंबरपासून नागपूर येथे आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार या दोन्ही वयोवृद्ध शेतकरी भावांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT