Accident Pudhari
यवतमाळ

Yavatmal accident | काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; भरधाव ट्रॅक्टर उलटून महिला मजूर ठार, ९ जण जखमी

चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्रॉल्या उलटल्याने हा भीषण अपघात झाला

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : कष्ट उपसून सुखाच्या आशेने घराकडे परतणाऱ्या ऊसतोड मजूरांवर नियतीने घाला घातला आहे. ऊस तोडणीचा हंगाम संपवून गावी परतत असताना, घरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर मजुरांचा ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अर्चना राम व्यवहारे या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एका पाच वर्षीय मुलीसह नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

पुसद तालुक्यातील धनज, वेणी, घनसळ आणि मरसूळ येथील मजूर लातूर जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी गेले होते. हंगाम संपवून हे सर्व मजूर ट्रॅक्टरने आनंदाने आपल्या गावी परतत होते. शुक्रवारी रात्री वारंगा फाटा येथे मुक्काम केल्यानंतर, शनिवारी सकाळी त्यांनी पुढचा प्रवास सुरू केला. मात्र, आडद ते धनज मार्गावरील घाटात चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि मजुरांनी भरलेल्या दोन्ही ट्रॉल्या भीषणपणे उलटल्या.

मदतीसाठी धावले गावकरी

अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी मजुरांचा मोठा आक्रोश ऐकू येत होता. धनजपासून अवघ्या दोन किमीवर हा अपघात झाल्याने स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने, उपचारापूर्वीच अर्चना व्यवहारे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या अपघातात पाच वर्षांचा चिमुरडा अभिषेक धुर्वे याच्यासह मथुरा हळसे, सुनीता गुहाडे, रामराव व्यवहारे, बालाबाई भडंगे, सुशीला हाळसे, रेखा धुर्वे, अनिता ढंगारे आणि विलास ढंगारे हे मजूर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मजुरांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT